लोकमत न्यूज नेटवर्कजालना : युतीच्या बालेकिल्ल्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसला नवसंजीवनी दिली. २०१४ मध्ये भाजपचे जे तीन आमदार होते. ते तिन्ही किल्ले त्या-त्या आमदारांनी कायम ठेवले. घनसावंगी मतदार संघात रात्री उशिरापर्यंत कधी टोपेंना तर कधी उढाणांना मताधिक्य मिळत गेले. टोपे यांचा निसटता विजय झाला.जालना विधानसभा मतदार संघाचा विचार करता हा मतदार संघ कधीच कोणत्या एका पक्षाकडे राहिला नाही. १९९९ मध्ये कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकरांचा पराभव केला. त्यावेळी देखील खोतकर हे राज्यमंत्री होते आणि हाच इतिहास पुन्हा २०१९ मध्ये देखील तसाच पुढे आला आहे. मध्यंतरी संपूर्ण देशात आणि राज्यात काँग्रेसची दोलायमान अवस्था होती. काँग्रेसकडून उमेदवारी घेण्यासही कोणी धजावत नव्हते. अशा स्थितीत काँग्रेसची निष्ठा असलेल्या कैलास गोरंट्याल यांनी मोठ्या ताकदीने खोतकर यांना यावेळी टक्कर दिली. २०१६ मध्ये जालना नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून मतदान झाले. त्यावेळी कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यावेळी भाजप-शिवसेना युतीने त्यांच्या विरोधात चक्क उमेदवार न देता अपक्ष उभे असलेल्या शकुंतला कदम यांना पाठिंबा दिला. त्यावेळी गोरंट्याल यांनी सर्व ताकद लावून संगीता गोरंट्याल यांना ५५ हजार मते मिळवून विजयी केले.दुसऱ्या एका कारणांचा विचार केल्यास शिवसेना आणि भाजपमध्ये मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेपासून मतभेद झाले होते. भाजपला अध्यक्षपद मिळू नये म्हणून शिवसेनेने चक्क राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करुन अनिरुध्द खोतकर यांना अध्यक्ष केले. याचाही परिणाम ग्रामीण भागातील मतांवर झाल्याचे बोलले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खा. रावसाहेब दानवे यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न अर्जुन खोतकरांनी केला होता. हे त्यांचे आव्हान मागे घ्यावे म्हणून खुद्द मुख्यमंत्री आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना दोन वेळेस खोतकरांच्या निवासस्थानी यावे लागले होते. ही सलही खोतकरांच्या पराभवासाठी कारणीभूत मानली जात असल्याची चर्चा आहे. नंतर दानवे आणि खोतकर यांनी आमच्यातील वाद हा एक नाटक होते, असे सांगून यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कसा वरवरचा होता, याबाबतही चर्चा सुरू आहे. कैलास गोरंट्याल यांनी पालिका ताब्यात असल्याने विविध नवीन कॉलन्यांमध्ये रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या इ. विकास कामे करुन विधानसभेची पायाभरणी केली होती, असे म्हणावे लागेल.भाजपचे गड कायमभारतीय जनता पक्षाने २०१४ च्या निवडणुकीत परतूर, भोकरदन आणि बदनापूर या मतदार संघात विजय मिळविला होता. त्यावेळी देखील भाजपने आज विजयी झालेल्या उमेदवारालाच तिकीट दिले होते. यावेळी भोकरदन मतदार संघात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुलासाठी राजकीय मैदान तयार ठेवले होते.अशाही स्थितीत तीन वेळेस आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी ८६ हजार मतांपर्यत मजल मारुन आपली ताकद दाखवून दिली. परतूर मतदार संघात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या समोर माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी तगडे आव्हान उभे केले होते.लोणीकरांचे ब्रह्मास्त्र पंतप्रधानांची सभालोणीकरांनी ब्रह्मास्त्र वापरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा परतूरमध्ये घेतली. ही सभा लोणीकरांसाठी महत्त्वाची ठरली. या सभेमुळेच मतदार संघातील वातावरण बदलले. यामुळे लोणीकरांना विजय सुखकर झाला. जेथलिया यांनी ८० हजार मते घेऊन आपला दांडगा जनसंपर्क कायम असल्याचे सिध्द केले.बदनापूर मतदार संघात नारायण कुचे यांनी पुन्हा एकदा विजय संपादन केला आहे. केलेली विकास कामे त्यांच्यासाठी वरदान ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी यांनी याही निवडणुकीत कुचे यांच्या नाकी नऊ आणले होते. परंतु, शेवटी कुचे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?मातब्बर उमेदवारांच्या पराभवाने पदाधिकारी कार्यकर्ते हवालदिल झाले होते. नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या निकालासाठीचा उत्साह यंदा तुरळक दिसून आला.निकालासाठी कडेकोट बंदोबस्त असतानाही जालना-औरंगाबाद मार्गावर वाहतुकीचा खोळंबा कायम असल्याचे दिसून आले.पोस्टल मतांची मोजणी करताना कुठे आधी तर कुठे शेवटी करण्यात आल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण रात्री उशिरापर्यंत कायम होते.
शिवसेनेच्या बाणाचा लक्ष्यभेद चुकला, भाजप-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत, काँग्रेसला संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:51 AM