जालना : जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे बुधवारी रात्रीपासून अचानक गायब झाले आहेत. मित्राला भेटण्यास जात असल्याचे सांगून ते रात्री घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे, बाहेर पडताना त्यांनी मोबाईल, वाहन असे काहीही सोबत नेले नव्हते. एसीबीचे वरिष्ठ अधिकारी जालन्यात तळ ठोकून असून कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे काल बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास शहरातील यशवंतनगर भागातील राहत्या घरून मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे पत्नीस सांगून घराबाहेर पडले होते. घराबाहेर जाताना त्यांनी कोणतेही वाहन, मोबाईल फोन आणि खिशातील वॉच पाकीटही सोबत नेलेले नाही. याबाबत माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे हे गुरुवारी दिवसभर जालना शहरात ठाण मांडून होते.
एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली आहे व बऱ्याच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. दोन दिवसांपासून त्यांचा कोणाशीही संपर्क झालेला नाही. यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंगची गुरुवारी रात्री उशिरा पत्नीच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली आहे. ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली असून, त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली झाली आहे.