मंठा ( जालना ) : तालुक्यातील खोराड सावंगी येथे २६ जुलै रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी ज्या व्यक्तींनी लस घेतली, त्यांना आरोग्य विभागाकडून मुदत संपलेल्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. यातील बहुतांश ग्रामस्थांना रिॲक्शन झाले आहे. यातील पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खोराड सावंगी येथे २६ जुलै रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे यांच्यासह डॉ. एकडे, देशमुख, वाघमारे व परिचारिका आर. एच. राठोड हे उपस्थित होते. या शिबिरात ९० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी कॅल्शियम ॲण्ड व्हिटॅमिन ही गोळी देण्यात आली होती.
परंतु, या गोळीची जून महिन्यातच मुदत संपल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी २५ ते ३० जणांचे पोट दुखणे, संडास व उलटी होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही लोक मंठा येथे उपचार घेत आहेत, तर काही लोक जालना येथे उपचार घेत असल्याची माहिती खोराड सावंगीचे उपसरपंच संदीप ठोकरे यांनी दिली. संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ठोकरे यांनी केली.
चौकशी करण्यात येईल२६ जुलै रोजी खोराड सावंगी येथे लसीकरण कॅम्प घेण्यात आला होता. त्यावेळी आरोग्य विभागाकडून मुदत संपलेल्या गोळ्या दिल्याचे उपसरपंच संदीप ठोकरे यांनी मला कळविले आहे. मी तेथे डॉक्टरांना पाठविले असून, ज्यांना कुणाला त्रास होत असेल, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.-डॉ. दीपक लोणे, तालुका आरोग्य अधिकारी, मंठा.