- फकिरा देशमुख
भोकरदन : भोकरदन तहसिल कार्यालयाचे गेट तोडून वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळून नेल्याची घटना मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान घडली. दरम्यान, वाळू माफियांना अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या तहसिल कार्यालयाच्या आवारातून वाळू माफियांनी वाहन पळून नेल्याची ही तिसरी घटना आहे. आतातपर्यंत एकाही वाहनाचा तपास भोकरदन पोलिसांना लागला नाही हे विशेष आहे.
या बाबतची माहिती अशी की, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान महसुलाच्या पथकाने जवखेडा ठोंबरे शिवारात पूर्णा नदीच्या पात्राजवळ अवैध वाळूचा उपसा करीत असलेले विना नंबरचे टॅक्टर पकडले. पथकाने ट्रॅक्टरचा पंचनामा करून तहसिल कार्यालयात लावले. मध्यरात्री 1 च्या सुमारास नारायण रामराव ठोबरे चालक, भरत नाना कोंडके मालक, नितीन सुदाम कोंडके, नारायण कोंडके यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारात घुसून ट्रॅक्टर सुरु केले. कोतवाल प्रभू बंडू मोरे यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवला. यानंतर वाळू माफियांनी तहसिल कार्यालयाचे मुख्यगेट तोडून ट्रॅक्टर पळून नेला. या प्रकरणी कोतवाल प्रभू मोरे यांच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात 4 जानेवारी रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहन पळून नेल्याची झाली हॅट्ट्रिकतालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करणारी टोळी सक्रीय आहे. मग ज्याची सत्ता आहे त्याच्या मागेपुढे फिरून हे माफिया अधिकाऱ्यांवर राजकीय दडपण आणतात. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाने अक्षरशः वाळू माफिया समोर नांग्या टाकल्या आहेत. तहसिल कार्यालयातून वाहन पळून नेल्याची ही काही पहिली घटना घडली असे नाही, या पूर्वी 25 फेब्रुवारी 2020 रोजी याच कार्यालयातून जेसीबी पळविले होते. तर 12 नोव्हेंबर 2020 रोजी एक टॅक्टर पळून नेले तर आता 3 फेब्रुवारीच्या मध्यरात्री टॅक्टर पळून नेले त्यामुळे ही हॅट्ट्रिक झाली आहे.