लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : परतूर तालुक्यातील गोळेगाव येथे बुधवारी रात्री शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत किराणा दुकानासह घरातील साहित्य जळून खाक झाले. यात संबंधिताचे जवळपास नऊ लाखांचे नुकसान झाले असून, ग्रामस्थांनी नुकसानग्रस्तांना ५० हजाराची मदत केली.गोळेगाव येथे गणेश विठ्ठल राऊत, मुकुंद विठ्ठल राऊत या भावंडांचे किराणा दुकान आणि घर लागूनच आहे. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक किराणा दुकानास आग लागली. आग पहाताच जवळ असलेल्या नागरिकांनी राऊत यांच्या घराकडे धाव घेत घरातील मुलाबाळांना बाहेर काढले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. ग्रामस्थांनी सहा बोअरवेल सुरू करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत किराणा दुकानातील साहित्य आणि घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते.गोळेगाव सज्जाचे तलाठी जहागीरदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.राऊत यांच्या दुकानातील व घरातील गृहोपयोगी वस्तूंसह किराणा माल अंदाजे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. महावितरणच्या आष्टी शाखा अभियंता सानप व विद्युत सहायक धुमाळ यांनी देखील पंचनामा केला.तसेच आष्टी पोलीस ठाण्याचे सपोउपनि. पठाडे यांच्यासह चरवंडे शिकरे यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.ग्रामस्थांकडून आर्थिक मदतआगीच्या घटनेनंतर राऊत कुटुंंबाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गावात दवंडी देऊन राऊत कुटुंबियांना मदतीचे आवाहन केले. यामुळे जवळपास ५० हजार रूपयांची मदत जमा करून ग्रामस्थांनी राऊत कुटुंबाला दिली.राऊत कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी व आग आटोक्यात आणण्यासाठी दादाभाऊ तौर, अण्णासाहेब ढवळे, गजानन लोणीकर, बंडू पाटील, सुभाष अब्बड, गंगाधर घुंगासे, अलीम शेख, मंजू देवकर, रामभाऊ मोहळे, राजाभाऊ तौर, दादाभाऊ कोल्हे, रणजित कोल्हे, राजेभाऊ घोरड, पांडुरंग घुंगासे, भानुदास देवकर, नामदेव कोल्हे, कृष्णा मोहटे, संतोष तौर, शेख शगीर व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
आगीत घरासह दुकान जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:32 AM