लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोना संशयितांची संख्या वाढत असून, दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापनांना शनिवारी, रविवारी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. शहरातील काही ठिकाणी सुरू असलेल्या बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून आली. दरम्यान, रविवारी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून, यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहे. याच धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत शनिवारी जिल्ह्यातील जीवनावश्यक आस्थापना वगळता इतरांसाठी बंदच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, काही व्यापा-यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. पोलिसांनी दुकाने, व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यांनी दुकानांना टाळे ठोकले. काही भागात युवकांचे जथ्थे एकत्रित बसून चर्चाचे फड रंगविताना दिसून आले. दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना सर्वसामान्यांनी साथ दिली तरच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येणार आहे. त्यामुळे यापुढील काळात प्रशासनावर सक्तीची कारवाई करण्याची वेळ येऊ नये, यासाठी व्यापारी, व्यावसायिकांसह जिल्हावासियांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या घरातच राहणे गरजेचे आहे. रविवारी जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूमध्ये सर्वांनी सहभागी होण्याची गरज आहे.या भागात होती दिवसभर गर्दीजालना शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, मंगळ बाजार परिसरासह गांधी चमन, नूतन वसाहत, जुना जालना भागातील लतीफशहा बाजार भाजी मंडई भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून आली. गर्दीच्या ठिकाणी येणा-या नागरिकांनी दक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना न केल्याचे दिसले.सलून दुकाने तीन दिवस बंदजिल्हाभरातील सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय नाभिक सेवा संघाच्या वतीने घेण्यात आला आहे. काही भागांत २१ ते २३ मार्च तर काही भागात ३१ मार्च पर्यंत बंद पाळण्यात येणार असल्याचे नाभिक सेवा संघाचे मराठवाडा अध्यक्ष सेनाजी काळे, जिल्हाध्यक्ष कृष्णा पंडित, बदनापूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय वरपे, अंबड तालुकाध्यक्ष भागवत ग्राम, मंठा तालुकाध्यक्ष गणेश वाघमारे यांनी दिली.मोसंबी, रेशीम मार्केट बंद४कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोसंबी, रेशीम मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोसंबी मार्केट २३ ते २६ मार्च या कालावधीत तर रेशीम मार्केट २३ ते ३१ मार्च या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. शेतक-यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन सभापती अर्जुन खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, सचिव रजनीकांत इंगळे यांनी केले आहे.बसस्थानक, रेल्वेस्थानकावर गर्दीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विषय महत्त्वाचा असेल तरच प्रवास करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शनिवारी शहरातील बसस्थानकासह रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी दिसून आले. विशेषत: दक्षतेबाबत आवश्यक उपाययोजनांची काळजी घेणारे अभावानेच दिसून आले.स्टील उद्योग प्रथमच बंदजालना शहराची लाईफलाईन म्हणून ओळखला जाणारा स्टील उद्योग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी शनिवारी स्टील उद्योजकांची बैठक घेऊन कंपन्या बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला उद्योजकांनी प्रतिसाद दिला.शनिवारी दुपारी २ ते रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीस उद्योजक घनशाम गोयल, डी.बी.सोनी, सतीश अग्रवाल, सुरेंद्र पित्ती, अनिल गोयल आदींची उपस्थिती होती.
दुकाने बंद, रस्त्यावर वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 10:58 PM