लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. कार्यालय परिसरात बोअर असून सुध्दा नागरिकांना पाणी पिण्यास मिळत नसल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे.जुन्या तहसील कार्यालयाचे २०१४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर असलेल्या सुसज्ज नवीन इमारतीत करण्यात आले. मात्र सुरवातीपासून नूतन इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच नसल्याने शहरासह ग्रामीण भागातून येणाºया नागरिकांचे हाल होत आहेत. तहसील कार्यालयात तालुक्यातील १२२ गावांतील नागरिकांचा नेहमीच राबता असतो. शेतकरी, वयोवृद्ध, निराधार लाभार्थ्यांचा समावेश असतो. तहसील कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधांची वानवा दिसून येते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची पाण्याअभावी गैरसोय होत आहे. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी सुध्दा देण्यात येतो. मात्र प्रशासकीय उदासिनतेमुळे तब्बल पाच वर्षांपासून येथील तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकात संताप आहे. विशेष म्हणजे पाण्यासाठी लाख रूपये खर्च करून कार्यालय परिसरात बोअर खोदण्यात आला. त्याला मुबलक पाणी असताना तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असून आत्तापासून चांगलेच ऊन तापत आहे.बुधवारी तहसील कार्यालयात आलेल्या एका ६८ वर्षीय वयोवृद्धाला पाण्यासाठी भटकंती करावी लागली. जवळ पैशाची चणचण असताना नाईलाजाने त्यांना विकतचे पाणी प्यावे लागले. उन्हाळ्याचे दिवस बघता पाण्याअभावी नागरिकांची होत असलेली गैरसोय प्रशासन दूर करेल का, अशी विचारणा सर्वसामान्यांतून होत आहे.
तहसीलमध्ये पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:50 AM