- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टिका करून त्यांना चॅलेंज दिल आहे. जरांगे यांनी देखील आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर बार्शी येथिल मराठा बांधवांनी तब्बल ३०० गाड्याचा ताफा घेऊन शनिवारी अंतरवाली सराटी येऊन आमदार राजेंद्र राऊत यांच्या विषयी रोष व्यक्त केला. बार्शी येथे घोंगडी बैठक ठेवावी अशी विनंती बार्शी मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली.
आमदार राऊत यांनी जरांगे यांच्यावर आरोप केल्यानंतर जरांगे यांनी देखील राऊत यांचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले. दरम्यान, शनिवारी अंतरवाली सराटीत थेट बार्शीतून तब्बल ३०० गाड्या दाखल झाल्या. यावेळी झालेल्या बैठकीत बार्शीतून आलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी आमदार राऊत यांच्याबद्दल रोष व्यक्त केला. त्यानंतर जरांगे यांनी आमदार राऊत यांच्यावर धारदार टीका केली, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले. जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करत म्हटले की, "राऊत यांनी फितूरीचे संस्कार दाखवले आहेत. ते मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत." त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्याकडेही नाराजी व्यक्त करत, "मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं नाव खराब करण्यात येत आहे, आणि याचं उत्तर त्यांना दिलेच पाहिजे," असे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत म्हटले की, "देवेंद्र फडणवीस मराठ्यांना फसवण्याचं काम करत आहेत. त्यांनी मराठा समाजात दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "श्रीमंत लोकांना आरक्षणाची गरज नाही. त्यांना फक्त राजकारणासाठी मराठा समाजाची गरज आहे."
आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्यावर पत्रकार परिषदे काही आरोप केले. याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत, "तुला वेळ आल्यावर कळेल, देवेंद्र फडणवीसचे ऐकून तू किती चिखलात फसला आहेस," अशी सडकून टीका केली. तसेच मी राजगादीला किती मानतो हे उदयनराजे महाराज, कल्पना राजे मासाहेब आणि छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. तू कशाचाही शपथ घेतो, आम्हाला प्रश्न विचारणारा तू कोण? अशा शब्दात राऊत यांचा समाचार घेतला.