- संजय देशमुख (जालना)
जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता घटली असून, डाळीच्या भावातील तेजी मात्र, कायम आहे. ही तेजी आणखी काही महिने राहील, असे जाणकारांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजार समितीतील अन्नधान्याची आवक ४० टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. दरम्यान दोन वर्षांपूर्वी डाळीचे बंपर उत्पादन झाले होते. त्यावेळी सरकारने डाळींची निर्यात बंद करून ती नाफेड तसेच राज्य सरकारच्या मार्फत खरेदी केली होती. शासनाकडे जवळपास ३० लाख टन डाळींचा साठा होता, तो आता पाच लाख क्विंटलवर आला आहे. तसेच यंदा पावसाने दगा दिल्याने तूर, हरभऱ्याचे उत्पादन नगण्य होणार असल्यानेदेखील डाळींचे भाव हे वाढतच राहतील, असे सांगण्यात आले.
गेल्या सहा महिन्यांचा विचार करता यंदा दिवाळीतही बाजारपेठेतील डाळी वगळता अन्य अन्नधान्यात तेजी आलेली नव्हती. मालाला ज्याप्रमाणे उठाव असायचा तोदेखील यंदा दिसून आला नाही. बाजारपेठेत सध्या ज्वारी, बाजरीची आवक बऱ्यापैकी आहे. मोसंबीची आवक बऱ्यापैकी असली तरी, भाव नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी आहे. मोसंबीला तेलंगणा, हैदराबादमध्ये मागणी बऱ्यापैकी आहे. भाज्यांनाही उठाव नसल्याचे आठवडी बाजारात दिसून आले. भेंडी आणि शिमला मिरचीच्या भावामध्ये किंचित वाढ दिसून आली.
मोंढ्यात गहू २१०० ते २७००, ज्वारी २४०० ते ३०००, बाजरी १४०० ते २३००, मका १४०० ते १५२४, तूर ४४०० ते ५०००, चना ३८०० ते ४३००, सोयाबीन ३३२५ ते ३३५०, मक्याची आवक ३ हजार क्विंटल, सोयाबीनची आवक केवळ १००० क्विंटल असून, तूर अद्यापही आलेली नाही. ज्वारी, बाजरी, हरभरा ५०० क्विंटल आहे. साखरेचे भाव ३२२० ते ३३०० रुपये क्विंटल असून, अनेक कारखान्यांना गाळपाचा परवाना नसतानाही त्यांनी साखरेचे उत्पादन सुरू केले आहे. कोल्हापूर, सांगली, कर्नाटकातून इंडियन शुगर, तसेच अनेक बड्या कारखान्यांची साखर बाजारपेठेत दाखल झाली आहे.
यंदा दुष्काळामुळे डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे.घटल्याने डाळींचा साठा करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल दिसून येत असल्याने खरेदीत तेजी आली आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत डाळींच्या भावामध्ये तेजी अपेक्षित असल्याचे बोलले जाते. सरकारकडे असलेल्या डाळीच्या साठ्याची दोन वर्षाची मर्यादा आता संपत चालल्याने डाळींचा दर्जा घसरत आहे, त्यामुळे ही डाळ आता गोदामातून कशी बाहेर काढता येईल या विचारात शासकीय यंत्रणा असल्याचे सांगण्यात आले. ज्वारी एक हजार तीनशे रुपयांवरूनथेट दोन हजार चारशेरुपयांवर पोहोचली आहे.
जालना जिल्हा मोसंबीचे आगर म्हणून ओळखल्या जाते. सध्या चांगल्या मोसंबीला २० हजार ते २६ हजार रुपये प्रतिटन भाव मिळत आहे. तर मध्यम स्वरुपाच्या मालाला १५ ते २० हजार रुपये टन भाव मिळत आहे. दिल्ली, राजस्थान, कोलकाता या भागातही मोसंबीला मागणी असल्याची माहिती मोसंबी अडत असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनघाव यांनी दिली.