दीपक ढोले
जालना : गतवर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. असे असतानाही जिल्ह्यातून तब्बल ४७ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील ४१ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. इतर सहा मुलींचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देशासह राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. दुसरीकडे मात्र याच काळात ४७ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गतवर्षात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ६६ गुन्हे दाखल आहेत. त्यात १९ मुले व ४७ मुलींचा समावेश आहे. पोलिसांना १७ मुलांचा व ४१ मुलींचा शोध लावण्यास यश मिळाले आहे. १८ वर्षांखालील मुलगी पळून गेली असेल, हरवलेली असेल तर, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. १८ वर्षांच्या पुढील मुली अथवा महिलेच्या गुन्ह्यात मिसिंग दाखल करण्यात येते. बहुतांश प्रकरणांत मुली त्यांच्या मर्जीने प्रियकरासोबत लग्न करण्याच्या उद्देशाने किंवा सोबत राहण्यासाठी फरार झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अनेक प्रकरणांत सहमतीने पळून गेल्यामुळे या प्रकरणात १८ वर्षे पूर्ण नसले तर त्या मुला-मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
बेपत्ता असलेल्या त्या मुलींचा पोलीस प्रशासनाकडून सातत्याने शोध घेतला जातो. त्यामुळे वर्षाअखेर जेवढे गुन्हे दाखल झालेले असतात. त्यापैकी बहुतांश गुन्हे निकाली निघतात. पोलीस विभागाकडून मुलींचा शोध घेतल्या जात आहे.
काही तरुण अल्पवयीन मुलींना प्रेमात अडकवून पळून घेऊन जातात. याबाबत पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला जातो. आम्ही ४१ मुलींचा शोध घेतला आहे. उर्वरित ६ मुलींचा शोध सुरू आहे. हे प्रकार टाळण्यासाठी पालकांनीदेखील तेवढेच सतर्क राहून पाल्यावर लक्ष दिले पाहिजे.
- सुभाष भुजंग, पोनि. स्थानिक गुन्हे शाखा
२ मुलेही बेपत्ता
जिल्ह्यातून तब्बल १९ मुले बेपत्ता झाली आहेत. त्यापैकी १७ मुले मिळून आली, तर अद्यापही २ मुलांचा पोलिसांना शोध लागला नाही. पोलीस या मुलांचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कोणत्या वर्षी किती ?
२०१८
४७
२०१९
५४
२०२०
४७