जालना : जिल्हा रुग्णालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात चालू वर्षातील नऊ महिन्यातच उच्च रक्तदाबाचे (बीपी) तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यात जालना तालुक्यात सर्वाधिक १६८४ रुग्ण आढळून आले आहेत. विशेषत: उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये महिला रुग्णांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे.
जिल्हा रुग्णालयांतर्गत असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर आदी आजाराचे रुग्ण शोधून त्यांच्यावर नियमित उपचार केले जातात. चालू वर्षातील नऊ महिन्यात उच्च रक्तदाबाचे तब्बल ६११८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अंबड तालुक्यात ४२०, बदनापूर तालुक्यात ९६२, भोकरदन तालुक्यात १३०, घनसावंगी तालुक्यात ८५१, जाफराबद तालुक्यात ८११, जालना तालुक्यात १६८४, मंठा तालुक्यात ८४८ तर परतूर तालुक्यात ४१२ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांची शासकीय रुग्णालयामार्फत नियमित तपासणी सुरू असून, मोफत औषधांचेही वाटप केले जात आहे. वाढणारे उच्च रक्तदाबाचे रुग्ण पाहता नागरिकांनी स्वत:च्या हृदयाची अधिक काळजी घेण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
मधुमेहाचे २८९५ रुग्ण
जिल्ह्यात चालू वर्षात आजवर मधुमेहाचेही २८९५ रुग्ण आढळून आले आहेत. यात अंबड तालुक्यात ४२५, बदनापूर ३१५, भोकरदन ६३, घनसावंगी ४४३, जाफराबाद ४०९, जालना ७१५, मंठा ३४५ आणि परतूर तालुक्यात १८० रुग्ण आढळून आले आहेत. वाढणारा मधुमेहाचा आजारही सर्वसामान्यांसाठी घातक असाच आहे.
ही आहेत कारणे
अनुवंशिक होणारा आजार
वाढलेली धावपळ आणि मानसिक ताण
बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन, मिठाचा अतिरिक्त वापर
अपुऱ्या प्रमाणात होणारी झोप
मद्यपान, धूम्रपानासह इतर व्यसने
कमी होणारी शारीरिक हलचाल, वाढलेले वजन
अशी आहेत लक्षणे
डोके जड होणे
कमीत कमी हालचालीत थकवा जाणवणे
अस्वस्थ वाटणे, भीती वाटणे, छातीत धडधड करणे, मळमळ, उलटी आदी.
अशी घ्या काळजी
बाहेरील विशेषत: तळलेले पदार्थ कमी खावेत
नियमित व्यायाम करावा
पुरेशी झोप घ्यावी
मिठाचा प्रमाणात वापर करावा
वाढलेले वजन कमी करावे
जेवणात पालेभाज्यांचा वापर करावा
मानसिक तणाव कमी करावेत
वेळेवर उपचार घ्यावेत.
कोट
धावपळीच्या जीवनात जीवनशैलीत झालेला बदल हा उच्च रक्तदाब होण्यास अधिक कारणीभूत आहे. हा आजार होऊ नये यासाठी आहार, वजनावर नियंत्रण ठेवण्यासह मानसिक तणाव कमी करणे गरजेचे आहे. शिवाय हृदयाशी संबंधित कोणताही त्रास होत असेल तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत औषधोपचार घ्यावेत.
डॉ. अर्चना भोसले
जिल्हा शल्यचिकित्सक.