जालना : आता नाही तर कधीच नाही, आरक्षण नाही तर भविष्य नाही, म्हणत साष्ट पिंपळगाव येथे मराठा आंदोलनाचा सुरू झालेला वणवा ७ फेब्रुवारीला जालना शहरात पोहोचणार आहे. राज्य सरकार करीत असलेली नोकरभरती रद्द करण्याची मागणी आता मराठा समाजातून पुढे येत आहे. यासाठी ७ फेब्रुवारी रोजी मराठा एल्गार मेळावा आयोजित करण्यात असल्याची माहिती ‘शिवसंग्राम’चे विदर्भ प्रभारी प्रशांत गोले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या मराठा एल्गार परिषदेमुळे आरोग्य विभागात होत असलेली १७ हजार पदांची भरती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. या भरतीमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना मिळणार नसल्याने आरोग्य मंत्र्यांच्या शहरात ही भरती थांबविण्यासाठी ७ फेब्रुवारी रोजी मराठा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे मार्गदर्शन करणार असल्याचेही गोले म्हणाले.
यावेळी प्रशांत इंगोले म्हणाले की, एमपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने अनेक मराठा तरुण आपल्या नोकरीच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच आता पुन्हा राज्य सरकार विविध खात्यांतर्गत नवीन भरती काढत आहे. मुळात सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना राज्यात नवीन नोकरभरतीचा घाट घालणे हा अन्याय आहे. याचा विरोध करून ही भरती थांबविण्यासाठी आता मराठा तरुणांनी एकत्र यावे, असे ते म्हणाले.
यावेळी नारायण टकले, शाम उढाण, ॲड. लक्ष्मण उढाण, लक्ष्मण नवले, सचिन मिसाळ, महेश डाके, सचिन खरात, बळिराम शेळके, स्वराज शीलवंत उपस्थित होते.
.....
चौकट
आता नाही तर कधीच नाही! - नीलेश गोर्डे
मराठा समाजावर सातत्याने अन्याय होत असून आरक्षणाचा तिढा कायम असताना शासन नोकरभरती करीत आहे. सरकारने काढलेली ही नोकरभरती हाणून पाडण्यासाठी मराठा तरुणांनी ७ फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यात सहभागी व्हावे. आता नाही तर कधीच नाही, ही भूमिका आता मराठा समाजाने घेतली पाहिजे, असे मत ‘शिवसंग्राम’चे युवा नेते नीलेश गोर्डे यांनी व्यक्त केले आहे.
.......