लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर/ वाटूर : काँग्रेसने साठ वर्षात शत्रू देशांना धडा शिकवण्याबरोबरच एकाही कर्ज बुडव्याला देश सोडून जाऊ दिले नसल्याची घणाघती टीका खा. राजीव सातव यांनी केली. वाटूर फाटा येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त काँग्रेस पक्षाकडून विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख वक्ते म्हणून खा. राजीव सातव हे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. डी. पी. सावंत, आ. वसंतराव चव्हाण, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, रामप्रसाद बोराडे, माजी खा. तुकाराम रेंगे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंटयाल, माजी आ. धोंडीराम राठोड, राजाभाऊ देशमुख, प्रा. सत्संग मुढे, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे उपस्थित होते.यावेळी खा. सातव म्हणाले की, भाजपा सरकारमधील नेते नेहमी आपल्या भाषणात एकच विचारतात, काँग्रेसने साठ वर्षात काय केले? परंतु आम्ही तुमच्यासारखे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखे कोट्यवधींच्या कर्ज बुड्यांना देश सोडून जाऊ दिले नाही. तसेच बँकांची कधीच एवढी दुरवस्था होऊ दिली नाही. नोटाबंदी करून यांच्याच नेत्यांनी व बॅकांनी घोटाळे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधीला बोलवले. आमचे मनमोहन सिंग दहा वर्षे या देशाचे पंतप्रधान राहिले पण त्यांनी पाकिस्तानात पाय ठेवला नाही. स्व. इंदिरा गांधीनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. या सरकारने छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मोडीत काढले असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्याचे आहेत. परंतु येथे शेतकऱ्यांना कर्जमाफीचाही लाभ मिळत नाही, पीकविमा नाही, बँका शेतक-यांना दारात उभे करायला तयार नाहीत. शेतकºयांचे कर्ज तुम्हाला माहीत नाही. या मतदार संघात सत्ताधारी स्वत:चे घर भरण्याचे काम करीत असल्याचेही सातव यांनी सांगितले. यावेळी मा. आ. सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, काँग्रेसची ताकद वाढत आहे. सत्ताधारी मनमानीपणे कारभार करीत आहेत. शेतकरी, सर्वसामान्य माणूस आज त्रस्त आहे. सर्वानी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.