लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. लाकडाने भरलेली वाहने रस्त्याने जाताना पाहावयास मिळत आहेत. तरीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे ही वाहने सर्रास पोलीस ठाण्यासमोरून जात आहेत. यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अनेकदा वनप्रेमी लाकडाने भरलेले वाहने दिसताच वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळवितात. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. घनसावंगी तालुक्यातून जायकवाडीचा डावा कालवा गेला असल्याने तालुक्यात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षांची संख्या वाढली. परंतु, मागील चार महिन्यांपासून औरंगाबाद, पिंपळगाव व परतुर येथील काही व्यापारी सर्रासपणे दलालांमार्फत अनेक गावांमध्ये वृक्षतोड करित आहेत. तसेच नियमित १० ते २० ट्रॅक्टरद्वारे तोडलेल्या वृक्षांची वाहतुक करित आहेत. अनेकदा व्यापारी रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षाला आग लावतात. यानंतर मशिनच्या त्या वृक्षाची दोन तासात कत्तल केली जाते. तसेच पाचोड ते आष्टी राज्यमार्गाचे काम सुरू असल्यानेही लाखो वृक्षांची कत्तल केली जात आहे.घनसांवगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली, बोडखा, मांदळा, घोनसी, शिंदखेड, देवी देगाव, लिंबूनी या परिसरातील वनराई व्यापा-यांनी पुर्णपणे नष्ट केली आहे. एकीकडे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून दरवर्षी लाखो वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, येथे दिवसाढवळ््या वृक्षांची कत्तल होत असल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शेकडो वृक्षांची कत्तल...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 1:02 AM