जालना बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक दुष्काळ असला, तरी अद्याप कायम आहे. चातुर्मास संपल्याने वांगी आणि कांद्याला मागणी वाढल्याने वांग्याचे भाव प्रतिकिलो १० रुपयांनी वाढले असून, कांद्याच्या भावातही वाढ झाली आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी भाज्यांचा बोली पद्धतीने लिलाव होतो. पालेभाज्यांची आवक जालण्यात बऱ्यापैकी असून, या भाज्यांच्या दरातही किंचितशी वाढ झाली आहे. भेंडी ३० रुपये किलो, तर वांग्याचे भाव सरासरी ३५ ते ४० रुपये किलो आहेत. हिरवी मिरची, चुका, लिंबू आदी भाज्यांनाही मागणी असून, ढोबळी मिरचीचे भाव किलोमागे ५ ते ७ रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या लग्नसराई जोरात असल्याने सर्वच भाज्यांची मागणी वाढलेली आहे. फुलकोबी, टोमॅटोची आवकही विदर्भातून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या किंमतींमध्ये किरकोळ बाजारात मात्र, वाढ दिसून येते.