लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जर्मन डॉक्टरांना चाळीस दिवस सुट्या दिल्या जातात. या चाळीस दिवसातील ते वीस दिवस भारतातील जालन्यात येऊन रूग्णसेवा करतात. अत्यंत क्लिष्ट असलेल्या फाटलेली टाळू, चिकटलेले ओठ, जळाल्यामुळे आलेले त्वचेवरील अपगंत्व या आजारांवर हे डॉक्टर येथील मिशन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करतात. गेल्या १६ वर्षापासून त्यांचा हा सेवायज्ञ सुरू असून, यंदाचे हे १७ वे वर्ष आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम चालविला जात आहे.रोटरी क्लब जालना आणि जर्मनीतील रोटरी सदस्यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित येत, १६ वर्षापूर्वी समाजातील गोरगरिब रूग्णांना दिलासा देण्यासाठीचा हा उप्रकम रूग्णांसाठी वरदान ठरला आहे. याच शस्त्रक्रिया खाजगी रूग्णांलयात करण्यासाठी किमान एक ते दीड लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असतो. परंतु जर्मनीतील डॉक्टर त्या मोफत करत असल्याने रूग्णांना मोठा आर्थिक दिलासही या निमित्ताने मिळत आहे. त्यात हे जर्मन डॉक्टर निष्णात असल्याने अत्यंत दर्जेदार उपचार रूग्णांवर होत आहे. महत्वाची काही औषधीही रूग्णांना ते देत असल्याने उपचार सुलभ होत आहेत.या रूग्णांमध्यये संर्पूण महाराष्ट्रातून रूग्ण सहभागी होत असल्याचे चित्र आहे. जर्मन डॉक्टर जेहार्ड यांच्या नेतृत्वाखाली १२ जणांच्या डॉक्टरांचे पथक येथे येते. त्यांना हिंदूजा हॉस्पिटलमधील प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनिल टिबडीवाल यांचेही मोठे सहकार्य मिळते. सात वर्षापूर्वी टिबलीवाल यांच्या आईचे शिबिरा दरम्यान निधन झाले होते, परंतु त्यांनी हातावर असलेल्या शस्त्रक्रिया करून नंतरच आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या या कर्तव्य दक्षतेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते.यंदाही या शिबिराला प्रारंभ झाला असून, चार मार्चला हे शिबीर संपणार आहे. गेल्या आठ दिवसात जवळपास ७०० पेक्षा अधिक रूग्णांवर शस्त्रक्रिया पार पडल्या असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष सुदेश सकलेचा आणि रोटरीचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद झांझरी यांनी दिली. हे शिबीर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी मिशन हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सी.डी. मोजेस आणि त्यांचा सर्व स्टाफ रूग्णांच्या सेवेत असतो. नातेवाईपेक्षाही हे कर्मचारी रूग्णांची काळजी जास्त घेत असल्याचे येथील रूग्णांशी संवाद साधला असता सांगण्यात आले.हे शिबीर जालन्यात घेण्यासाठी पूर्वी प्रसिध्द बियाणे उद्योजक स्व.बद्रीनारायण बारवाले यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र राजेंद्र बारवाले हे देखील यासाठी तेवढीच मदत करत असल्याची माहिती रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.दोन हजारपेक्षा अधिक शस्त्रक्रियागेल्या १६ वर्षापासून सुरू असलेल्या या प्लास्टिक सर्जरी शिबिरात आतापर्यंत जवळपास दोन हजारपेक्षा अधिक रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.विशेष म्हणजे हे शिबीर आता पुढील वर्षी होणार असल्याने त्यातील रूग्णांची निश्चिती देखील रूग्ण तपासणी नंतर झाली आहे. त्यामुळे जर्मन डॉक्टरांच्या रूग्णसेवेचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी असल्याची भावना शिबिराला भेट दिली असता, अनेकांनी व्यक्त केली.
जर्मन डॉक्टरांनी फुलवले रूग्णांच्या चेहऱ्यावर हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:47 PM