सर्पमित्रांकडून जनजागृती : जिल्ह्यामध्ये बिनविषारी साप अधिक
जालना : सापाबद्दल असलेल्या गैरसमजामुळे साप दिसला की, त्याला मारण्यास धावणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्याच सापाला नागपंचमीदिवशी पुजले जाते. परंतु, जालना जिल्ह्यात विषारीऐवजी बिनविषारी साप अधिक आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील सर्पमित्रही जनजागृती मोहीम राबवित आहेत.
नागपंचमी हा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी सापाची पूजाही केली जाते. एरव्ही, साप दिसल्यानंतर अनेकांची भांबेरी उडते. अनेकजण त्याला मारायला धावतात. परंतु, जिल्ह्यातील सर्पमित्रांनी केलेल्या जनजागृतीमुळे आज सापाला मारणाऱ्यांची संख्या कमी हाेत आहे. शिवाय, या सापांनाही जीवदान मिळू लागले आहे.
जिल्ह्यात आढळणारे सापांचे प्रकार
विषारी : कोब्रा, घोणस, मण्यार, फुरसे हे विषारी साप जिल्ह्यात आढळून येतात. यात घोणस या प्रजातीचे सर्प जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळून येतात.
बिनविषारी : धामण, गवत्या, ट्रिंकेट, मांडूळ, कुकरी, वाळा, मांजऱ्या, शेलाटी, कवड्या हे बिनविषारी साप जिल्ह्यामध्ये आढळून येतात.
साप आढळला तर...
जिल्ह्यात आढळणारे सर्व साप विषारी नाहीत. साप स्वत:हून हल्ला करीत नाही.
सापावर पाय पडला किंवा आपण त्याच्या जवळ गेलो तर साप दंश करतो.
त्यामुळे साप दिसल्यानंतर त्याला मारू नये. त्याच्यावर नजर ठेवून आपल्या परिसरात असलेल्या सर्पमित्रांशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत तो साप वनक्षेत्रात सोडून द्यावा.
साप हा तर शेतकऱ्याचा मित्र
शेतातील पिकांची, धान्याची उंदीर नासाडी करतात. या उंदरांना साप खातात. तर, मांडुळासह इतर काही साप हे जमीन सुपीक करण्यासाठी मोठी मदत करतात. त्यामुळे या सर्पांना शेतकऱ्यांचे मित्र म्हणतात. अनेक शेतकरी साप आढळला तर शेतकरी मित्रांना बोलावितात.
सर्पमित्र काय म्हणतात...
मी सर्पमित्र म्हणून आठ ते दहा वर्षांपासून काम करीत आहे. आजवर जवळपास दीड हजारांवर सापांना जीवदान दिले आहे. साप स्वत:हून हल्ला करीत नाही. त्यामुळे त्याला न मारता सर्पमित्रांशी संपर्क करावा. - विजय आगळे, सर्पमित्र