लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत जालना शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नगरविकास विभागाने १६ कोटी ५२ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असून, सामनगाव येथील रखडलेला घनकचरा प्रकल्पही कार्यान्वित होणार आहे.प्रत्येक शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. जालना शहरात सध्या दररोज १०५ टन कचरा निघतो. कच-याचे घरोघरी जाऊन संकलन करण्यासाठी आवश्यक यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नसल्याने काही कामे खाजगी एजन्सीमार्फत करावी लागतात. शिवाय २००८-०९ मध्ये सामनगाव येथे पथदर्शी म्हणून सुरू करण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाचे कामही रखडले आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यासह शहरातील घनकच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत नगरविकास विभागाने जालना शहरासाठी १६ कोटी, ५२ लाख ३९ हजारांच्या नागरी घनकचरा व्यवस्थाप प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. केंद्र व राज्यशासनाकडून मिळणा-या निधीबरोबर नगरपालिकेलाही यात लोकवाटा भरावा लागणार आहे. प्राप्त निधीतून ३३ नवीन घंटागाड्या, दोन डंम्परप्रेसर, लोडर, कॉम्पॅक्टर आदी वाहनांची खरेदी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सर्व खरेदी शासनाच्या ‘गव्हर्नमेंट मार्केटप्लेस पोर्टल’ वरूनच करावी लागणार आहे. ओल्या व सुक्या कचºयावरील प्रक्रियेसाठी सामनगाव येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे. या सर्व कामांचा सविस्तर अहवाल पालिकेला नगरविकास विभागास वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. येत्या पाच महिन्यात घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी माहिती नगरपालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी दिली.
घनकचऱ्याचा प्रश्न सुटणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:42 AM