वडीगोद्री: आज दुपारी सव्वा दोन वाजता शासनाचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित केल्याची घोषणा केली. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन उपोषणकर्त्यांनी तब्बल दहा दिवसांपासून सुरू उपोषण सोडले. दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश आणखी आला नाही, तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आले आहे. इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले.
आज दुपारी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शिष्टमंडळ दाखल झाले. शिष्टमंडळाची विमानतळावरच काही वेळ बैठक झाली. त्यानंतर ते जालन्यातील उपोषणस्थळ वडगोद्रीच्या दिशेने रवाना झाले. दुपारी सव्वा दोन वाजेला शिष्टमंडळ उपोषणस्थळी दाखल झाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासोबत शिष्टमंडळाने सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची माहिती दिली, तसे पत्र दिले. त्यानंतर हाके यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. यावेळी हाके म्हणाले, आम्ही मागणी केलेल्या तीन मुद्यांची पूर्तता होईल असे शासनाने लिखित स्वरूपात दिले आहे. तर आणखी दोन मुद्दे पूर्ण झाले नाहीत. यापुढे हे आंदोलन सुरूच राहील. विक्रमी वेळेत बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शासनाने बोगस प्रमाणपत्र काढणारे आणि ते देणारे या दोघांवर कारवाई करण्यात येईल असे शासनाने सांगितले आहे. पुढचा लढा पंचायतराज मधील ओबीसी आरक्षण सुरक्षित करण्याचा आहे, असेही हाके यांनी जाहीर केले.
शासनाच्या शिष्टमंडळात कोण होतेराज्य शासनातील मंत्री छगन भुजबळ, गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे पाच मंत्री आहेत. तर गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे ओबीसी नेते सुद्धा आहेत. यावेळी उपोषणस्थळी ओबीसी बांधवांची मोठी गर्दी झाली आहे.
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन, काय घडले १० दिवसांत सर्व मराठा कुणबी आहेत. त्यांना तसे प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. यासाठी सगेसोयरेचा आदेश शासनाने काढावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मात्र, सरसकट मराठा ओबीसीमध्ये आल्यास ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल, असे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन उभारून लक्ष्मण हाके सहकारी नवनाथ वाघमारे यांच्यासह वडीगोद्री येथे उपोषणाला बसले. शुक्रवारी, उपोषणाच्या ९ व्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळत चालली असताना सरकारी यंत्रणा सक्रिय झाली. ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यात बैठक झाली. त्यानंतर हाके यांनी केलेल्या काही मागण्या पूर्ण करण्यात आल्या. आज दुपारी याबाबतचे पत्र घेऊन सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले. सरकारचे मागणी मान्य झालेले पत्र आणि इतर मागण्यांवरचे आश्वासन ग्राह्य धरून हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याचे जाहीर केले. मात्र, लढा आणखी सुरूच राहिले असेही हाके या वेळी म्हणाले.