वडीगोद्री : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. पण, आज अधिवेशनात घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. सरकारने सगेसोयऱ्यांच्या कायद्याला बगल देऊन १० टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे. हा कायदा करण्याची कोणीच मागणी केलेली नसताना हे पाऊल सरकारने उचलले आहे, हे आम्हाला मान्य नाही. बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी आयोजित बैठकीत सांगितले. तसेच सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही, असा गंभीर आरोप देखील जरांगे यांनी यावेळी केला.
आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, आम्हाला टिकेल की नाही या लफड्यात पडायचं नाही. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. यासाठी मंगळवारी होणाऱ्या बैठकीसाठी मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आमच्या हक्काच्या ओबीसीमधील आरक्षणाची मागणी आहे. त्याची अंमलबजावणी पाहिजे. आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत. उगाच समाजाचा अपमान करायचा हे योग्य नाही. सरकारने विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांच्या मागणीवर निर्णय घ्यायला पाहिजे होता. यासाठी आक्रोश करतोय त्या माता-माउलींची चेष्टा सरकार करत आहे. आम्ही आधीही स्वागत केले होते. आताही स्वागत करतो; पण आमच्या हक्काचे आरक्षण द्या, यापूर्वीही सांगितले होते. ते नाकारण्याचे काही कारणच नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
घाईगडबड नाहीच आहे. हरकती तपासण्यासाठी यंत्रणा आहे. आणखी मनुष्यबळ वाढवा. आम्ही संयमी आहोत. उद्या आमचा निर्णय ठरल्यावर त्यांना आमची भावना कळेल. आम्हाला आज हा दिवस बघायला लावला. अंमलबजावणी पाहिजे. हा हट्टीपणा नाहीये अधिकार आहे. सरकारने केलेल्या कायद्यामुळे पोरांचे काही कल्याण होणार नाही. मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता तर इतके दिवस आंदोलन चाललेच नसते. मी लेकरांचे वाटोळे नाही करू शकत. त्यांना मर्यादा आहे तशाच आम्हालाही आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारशी आमची वैयक्तिक काही वैर नाहीये, आंदोलनाची दिशा ठरली की, सगळे उडवणार आहेत. सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना काम करू देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी लावला आहे.
उपचार नाकारलेमनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सलाइन काढून घ्या असे म्हणत हाताला टाकलेली सलाइन स्वतः काढण्याचा प्रयत्न केला. आता सरकारचे उपचार बंद, असे जरांगे म्हणाले.