अंबड (जि. जालना) : दीड एकर शेतीसाठी जन्मदात्या पित्याचा दोरीने गळा आवळून, डोक्यात मारहाण करीत मुलानेच खून केला. ही घटना रविवारी सकाळी झिरपी (ता. अंबड) शिवारात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरीनाथ श्रीपती भवर (६५, रा. झिरपी, ता. अंबड) असे मृताचे नाव आहे, तर सर्जेराव पंढरीनाथ भवर असे आरोपीचे नाव आहे. झिरपी येथील पंढरीनाथ भवर यांची गावच्या शिवारात शेती आहे. त्यांचा मुलगा सर्जेराव हा दीड एकर शेती माझ्या नावावर करून दे म्हणून वडिलांशी सतत भांडण करायचा. शेती नावावर न केल्यास ठार मारण्याच्या धमक्या देत होता. वडील शेती नावावर करीत नसल्याचा राग मनात धरून सर्जेरावने रविवारी पहाटे पित्याचा दोरीने गळा आवळून, डोक्यात मारहाण करून खून केल्याची तक्रार मृताचा भाऊ जगन भवर यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सर्जेराव भवरविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे करत आहेत.
३० जुलैपर्यंत कोठडीझिरपी येथील खून प्रकरणातील आरोपी सर्जेराव भवर याला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.