जालना : शेतजमीन, तसेच खंडणीच्या प्रकारामुळे जालना अपहरण करणे, गोळीबार करून दहशत पसरविणे, यामुळे जालना आधीच राज्यभर चर्चेत होते आणि आता गेल्याच आठवड्यात व्यापारी तथा उद्योजक राजेश सोनी यांच्या अपहरणाच्या प्रयत्नाने पुन्हा चर्चेत आले आहे.
या अपहरणामागेही शेतजमिनीचाच धागा असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. सोनी यांचे अपहरण करून त्यांच्या नातेवाइकांकडून दीड ते दोन कोटी रुपये खंडणी मिळेल, या हेतून एखाद्या चित्रपटाला शोभेल, असे कारस्थान रचून सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला, परंतु तो प्रत्यक्षात आला नाही. सोनी यांचे अपहरण करण्यासाठी अपहरणकर्त्यांनी पुण्यातून कार भाड्याने घेतली. रात्रीच्या वेळी पुण्याच्या बाहेर आल्यावर गावठी बंदुकीचा धाक दाखवून हातपाय बांधून चालकास कारमधून बाहेर फेकले. दुसऱ्या दिवशी जालना शहरातील दत्त मंदिराजवळ उद्योजक राजेश सोनी यांना गावठी बंदुकीचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले. दरम्यान, कर्ज फेडण्यासाठी सोनी यांचे अपहरण करून त्यांच्याकडून एक ते दोन कोटी रुपये वसूल करण्याचे नियोजन केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. राजेंद्र बाबासाहेब राऊत उर्फ राजन बाबुराव मुजमुले (२६ रा.परतूर, जि.जालना), विशाल संजय जोगदंड (२० रा. जोगदंड मळा, जालना), भागवत उर्फ संभ्या बालाजी राऊत (वय २०), पांडुरंग उर्फ ओम बबन वैद्य (वय २४ दोघे रा. वैद्यचा मळा, जालना), मोहम्मद इरफान मलिक रा. पडेगाव, औरंगाबाद) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील अन्य एक जण फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत. त्यांच्याकडून दोन गावठी बंदुका, पाच जिवंत काडतुसे, एक चारचाकी वाहन व खंजर असा १२ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, राजेंद्र बाबासाहेब राऊत उर्फ राजन बाबुराव मुजमुले (२६ रा. परतूर, जि.जालना) याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते. त्याने मित्रांच्या मदतीने गुन्ह्याचे नियोजन केले. आरोपी विशाल जोगदंड याचे शेत व्यापारी राजेश सोनी यांच्या शेतालगत आहे. त्याला सोनी यांच्याबाबत बरीच माहिती होती. त्यांनी सोनी यांच्या अपहरणाचा कट रचून त्यांच्याकडून एक ते दोन कोटी रुपए वसूल करण्याचे नियोजन केले होते. दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, सपोनि. शिवाजी नागवे, पोउपनि. दुर्गेश राजपुत, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, देविदास भोजने, विलास चेके, संदीप मांटे, सूरज ताठे व तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि. संभाजी वडते यांनी केली.
कार पळवून नेल्याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा
सोनी यांचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी पुणे येथे जाऊन इरटिगा गाडी भाड्याने केली. पुण्याच्या बाहेर आल्यावर चालकास गावठी बंदुकीचा धाक दाखवून हातपाय बांधून त्यास कारबाहेर फेकले. गाडीची नंबर प्लेट काढून कार घेऊन जालना येथे आले. कार पळवून नेल्याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जालना येथील दत्त मंदिराजवळ व्यापारी राजेश सोनी यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला. आरोपींनी सदरी कार ही औरंगाबाद येथील मोहम्मद इरफान मलिक याच्या घरासमोर उभी केली. दरम्यान, ताब्यात घेतलेले सर्व आरोपी हे तरुण आहे.
गुन्हे करण्यासाठी तो बदलायचा नाव
येथील राजेंद्र बाबासाहेब राऊत हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जालना, नाशिकसह इतर जिल्ह्यात चोरी, दरोड्यासारखे गुन्हे दाखल आहे. प्रत्येक गुन्हा करण्यासाठी तो आपले नाव बदलत होता. कधी राजेंद्र बाबासाहेब राऊत तर कधी राजन बाबुराव मुजमुले असे नाव सांगत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली. राजेंद्र राऊत व भागवत राऊत हे दोघे चुलत भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेतीच्या वादावरून मिळाला क्लू
आरोपी विशाल जोगदंड याचे शेत व्यापारी राजेश सोनी यांच्या शेतालगत आहे. त्याचे व सोनी यांचे शेतीवरून वाद सुरू होते. याबाबत फिर्यादी सोनी यांनी पोलिसांना माहिती दिली होती. यावरून पोलिसांनी विशाल जोगदंड याला ताब्यात घेतले होते. विशाल जोगदंड याने सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर, सर्वांना ताब्यात घेतले.
===Photopath===
280221\28jan_31_28022021_15.jpg
===Caption===
आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस दिसत आहे.