लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील सिपोरा बाजार येथील दाम्पत्य पंढरपुरच्या तिर्थयात्रेला गेले असताना ते पंढरपुरला पोहचण्यापूर्वीच त्यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळुन पुर्ण खाक झाले. काय उरले ते अंगावरचे कपडे एवढाच त्यांचा संसार राहिला. मात्र, देवाच्या दर्शनासाठी निघाल्यावर पाठ फिरऊन मागे येऊ नये, म्हणून जड अंतकरणाने त्यांनी पंढरपूरचे दर्शन घेतले. व पुढची तिर्थयात्रा रद्द करून सर्वजण दोन दिवसांपूर्वी सिपोराबजार येथे परत आले. तेव्हा सोनवणे पती-पत्नीला आपल्या घराची केवळ राखच दिसली. तेव्हा त्यांनी एकच हंबरडा फोडला होता़सिपोरा बजार येथील अरूण सोनवणे त्यांची पत्नी ज्योती सोनवणे हे १४ जानेवारी रोजी गावातील सात जोडप्या सोबत पंढरपूर, अक्क्लकोट आदी ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते. रात्री ९ च्या दरम्यान ते माजरसुंबा परिसरात पोहचत नाही. तोच त्यांना घराला आग लागल्याचा निरोप आला. पुढे जावे की, मागे परतावे हे त्यांना कळत नव्हते, मात्र सोबतच्यांनी दर्शनाला जाताना देवाकडे पाठ फिरून परत येऊ नये, असे सांगितले.त्यामुळे हे सोनवणे पती-पत्नी जड अंतकरणाने पंढरपूरला गेले. सर्वांनी दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनीच पुढचे देवदर्शन रद्द करून ते गावाकडे परतले. दोन दिवसांपूर्वी सकाळी हे पती-पत्नी गावात आल्यानंतर आपल्या घराकडे धावत गेले. तेव्हा त्या ठिकाणी त्यांना केवळ जळालेल्या घराची राख आणि जळालेले टिनपत्रे एवढेच शिल्लक दिसले. त्यामुळे त्यानी हंबरडा फोडला आता काय करावे, हे त्यांना कळत नव्हते, कारण रोज मजूरी करून कसेबसे टिन पत्र्याचे घर बांधले होते. आता ते सुध्दा जळाले आहे.
तीर्थक्षेत्रावरून येताच दिसली फक्त राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:55 AM