जालना : ‘सांस टूट जातेही रिश्ते टूट जाते है...’ हे बोल प्रसिद्ध कव्वालीकार अजीज नाझा यांच्या ‘ढलता सुरज धीरे...धीरे...ढलता है ढल जायेगा...’ या कव्वालीतील आहेत. याचे विदारक अनुभव कोरोनामुळे मृत्यू पावल्यानंतर संबंधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांना येत आहेत. कोरोना झाला म्हटल्यावर आपली प्राणप्रिय व्यक्तीही दोन हात दूर राहणेच पसंत करते. नव्हे तसे निकषच डॉक्टरांनी घालून दिले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास प्रशासनाकडून मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही. परंतु, अंत्यसंस्कार करतेवेळी संबंधितांच्या धर्मानुसार जे काही विधी असतात, ते पीपीई कीट घालून करू दिले जातात. परंतु, अनेकजण हे विधीही करण्यास घाबरत असून, आम्हीच जेवढे शक्य होईल तेवढे विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक अरूण वानखेडे, श्रावण सराटे, शोएब खान, उत्तम भालेराव, प्रभुदास नेमाडे, सचिन कांबळे, राजू गवळे, शकील बेग, दीपक कारके यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ५०० पेक्षा अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वानखेडे यांनी सांगितले. अनेक मयतांचे नातेवाईक हे पूर्ण संस्कार करण्याचे आग्रह धरत असल्यानेही कधीकधी आम्ही संकटात सापडतो.
गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्वजण हे काम आमचे कर्तव्य आणि नोकरीचा भाग म्हणून करत आहोत. परंतु, हे सर्व करत असताना आम्हाला आमच्यासह परिवाराची चिंता सतावत असते. घरी गेल्यावर दोनवेळा आंघोळ करून सर्व कपडे हे घराबाहेर ठेवूनच घरात प्रवेश करतो. अनेकवेळा तर केवळ जेवणासाठी घरी जावे लागते. त्यावेळी अंगणात आणि वऱ्हांड्यात बसून जेवण उरकावे लागते. अंत्यसंस्कार करण्यासाठी शासनाकडून म्हणजेच पालिकेकडून पीपीई कीट तसेच अन्य साहित्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि मुख्याधिकारी नितीन नार्वेकर हे दररोज आमच्या संपर्कात असतात. तसेच मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शेख अख्तर आणि शिक्षक असलेले मुजीबभाई यांची मोठी साथ आम्हाला मिळत असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
शेख अक्तर, मुजीबभाई
चौकट
मुलींचा पुढाकार लक्षणीय
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यावर ज्यांना मुलगा नसून, केवळ दोन अथवा तीन मुलीच आहेत. अशावेळेस अनेक मुलींनी न भीता आपल्या नातेवाईकांना हिंदू पद्धतीने पाणी पाजण्याची परंपरा पाळल्याचे दिसून आले. याचवेळी तर काही पुरूष मंडळी मात्र कोरोनाची लागण होईल, या भीतीने सतर्कता बाळगून भावनिक होण्यापेक्षा अंत्यसंस्कार होण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.