हिसोडा (जालना) : पिवळ्या पडलेल्या सोयाबीनला शेंगा येत नसल्याने भोकरदन तालुक्यातील लेहा शिवारातील एका शेतकऱ्याने बुधवारी दीड एकरातील सोयाबीन उपटून टाकली आहे. पेरणीवर झालेला खर्चही निघाला नसल्याने शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे.
लेहा शिवारातील गट नंबर ३४२ मध्ये शेख ऐजाज शेख रजाक यांची चार एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी व एक मुलगी आहे. उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच होतो. यंदा जुलै महिन्यांत पाऊस पडल्याने त्यांनी दीड एकरात सोयाबीन पेरली. जुलै महिन्यांत सतत पाऊस पडत राहिला. त्यामुळे पीकही चांगले आले.
सोयाबीन ऐन फुलोऱ्यात आली अन् पिवळी पडू लागली. त्यांनी महागडी औषधी खरेदी करून फवारणी केली. परंतु, तरीही काहीच फायदा झाला नाही. सोयाबीनला ना फुलोरा येत, ना शेंगा त्यामुळे त्यांनी सोयाबीन उपटून टाकण्याचा निर्णय घेतला. शेवटी बुधवारी सकाळी त्यांनी सोयाबीन उपटून टाकली. झालेला खर्चही निघाला नसल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.