- दीपक ढोले
जालना : जिल्ह्यात खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे उगवले नव्हते. कृषी विभागाने सदर बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले असून, संबंधित कंपन्यांवर कृषी विभागातर्फे कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यंदा जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या; परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी हतबल झाले होते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. कृषी विभागाने सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जिल्हाभरातून तब्बल २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या. तालुकास्तरीय समितीने पंचनामे करून नमुने घेतले. यात १,८०९ शेतकऱ्यांच्या बियाण्यात त्रुटी आढळून आल्या. यातील काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना बियाणे व नुकसानभरपाई दिली आहे; परंतु १४ कंपन्यांनी नुकसानभरपाई न दिल्याने त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
कृषी विभागाने सोयाबीन बियाणाचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आढळून आले. बियाण्यात ७० टक्के उगवण क्षमता लागते; परंतु सदरील २४ नमुन्यांत उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याने सदरील बियाणे उगवून आले नाही. संबंधित कंपन्यांवर कोर्ट केसेस दाखल केल्या जाणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
२ हजार ७३१ शेतकऱ्यांना करावी लागली दुबार पेरणीशेतकऱ्यांनी जूनच्या प्रारंभीच जोरदार पावसामुळे पेरण्या उरकल्या; परंतु सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. याबाबत जिल्हाभरातून २,७३१ तक्रारी दाखल झाल्या. आधीच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उसनवारी करून दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही बहुतांश शेतकऱ्यांची सोयाबीन उगवले नाही.
केवळ १३ कंपन्यांनी दिली भरपाई जवळपास ४१ कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी केवळ १३ कंपन्यांनी ८८ शेतकऱ्यांना बियाणे अथवा पैशाच्या स्वरूपात भरपाई दिली आहे. यात ६१ शेतकऱ्यांना बियाणाची बॅग, तर उर्वरित शेतकऱ्यांना ३ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळाली.
केसेस दाखल करणार जिल्हाभरातून सोयाबीन न उगवल्याच्या २,७३१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आम्ही आधीच १४ कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. बियाणांचे ३६ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी २४ नमुने अप्रमाणित आले आहेत. संबंधित कंपन्यांवर केसेस दाखल करण्यात येणार आहेत. - भीमराव रणदिवे, कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना
तालुकानिहाय प्राप्त तक्रारीतालुका प्राप्त तक्रारीजालना २२३बदनापूर ४३मंठा ९०७अंबड १३३घनसावंगी ३९६जालना २७भोकरदन ५५परतूर ९४७एकूण २७३१