लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आंदोलनामुळे शासनावर चोहोबाजुंनी दबाव वाढला आहे, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल. असा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी येथे बोलतांना व्यक्त केला. तथापी जालना जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ३ पासून बंद करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे.जालना जिल्हा सकल मराठा सामाजाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बुधवारपासून सुरू झालेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास गुरूवारी (ता.२) मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संवाद साधला. मंत्री असतांनाही सामाजाची भूमिका मंत्रीमंडळ, सभागृहात मांडली. निष्पाप तरूणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणारा महाराष्ट्रातील एकमेव मंत्री म्हणून आपण पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले. या माणीची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन गुन्हे व अटकसत्र थांबविल्याचा दावाही त्यांनी केला.तरूणांच्या भावना तीव्र असून, उद्रेक सोडून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवावे, लढाई जिंकली तहात हरायचे नाही यासाठी कायदा हातात घेऊ नका असे भावनिक आवाहनही खोतकर यांनी केले. यावेळी समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.घनसावंगीत ३६ तर बदनापूरमध्ये दोन गुन्हे दाखल झाले असून राजकारण, स्थानिक गटबाजीसाठी निष्पाप तरूणांना अडकवू नका असे आवाहन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान शुक्रवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक समिती सदस्य विनोद पाटील हे आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.शनिवारी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठकमराठा क्रांती मोर्चातील सर्व तालुका समन्वयक आणि सर्वपक्षीय मराठा समाजातील पदाधिका-यांची बैठक शनिवारी सकाळी ११ वाजता आंदोलनस्थळी आयोजीत करण्यात आली आहे.सामाजिक संघटनांचा पाठिंबामराठा आरक्षणास विविध सामाजीक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यात गवळी समाज संघटना, महात्मा फुले समता परिषद, भारिप - बहुजन महासंघ, वंजारी युवक संघटना, अलफतेह सामाजिक संघटना, मातंग मुक्ती मोर्चा, बागवान समाज, ओबीसी महासंघ या संघटनांच्या पदाधिका-यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
विशेष अधिवेशनाचा निर्णय लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:47 AM