जालना : एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जाणाऱ्या आईसह मुलाच्या दुचाकीला ट्रकचालकाने जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार मुलगा जखमी तर, पाठीमागे बसलेली आई जागीच ठार झाल्याची घटना १७ जानेवारी रोजी दुपारी ११:३० वाजता जालना-राजुर मार्गावरील समृद्धी पुलाजवळ घडली. शशिकलाबाई सखाराम बनकर (वय ८५) असे जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ऋषीधर सखाराम बनकर (वय ३२, दोघेही रा, देळेगव्हाण ता. जाफराबाद) असे जखमीचे नाव आहे.
जालना येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ऋषीधर व त्याची आई शशिकलाबाई हे दोघेही शुक्रवारी सकाळी १० वाजता देळेगव्हाण येथून दुचाकी (एमएच-२१-६४६९) ने जात होते. यादरम्यान, समृद्धी पुलाजवळ येताच अज्ञात ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात ट्रकच्या चाकाखाली शशिकलाबाई आल्याने त्यांच्या मुंडक्यावरून चाक जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋषींधर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी जितेंद्र तागवाले, मदन बहुरे आदींनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पंचनामा करून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.