जालना : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये जालना जिल्ह्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागात जालना जिल्ह्याचा सर्वाधिक निकाला लागला आहे.
यात औरंगाबाद ९२.१०, बीड ९१.२४, परभणी ९०.६६ तर हिंगोली जिल्ह्याचा निकाला ९१.९४ टक्के लागला आहे. बुधवारी दुपारी एक वाजेनंतर निकाल पाहण्यासाठी बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या उड्या पडला होत्या. त्यामुळे काही ठिकाणी निकाल कळण्यास विलंब झाला. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलवरच निकाल पहावा लागला.
जिल्ह्यात एकूण ३२ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ३० हजार ४३३ मुले उत्तीर्ण झाली. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये सर्वात जास्त निकाल हा जाफराबाद तालुक्याचा लागला असून, या तालुक्याची टक्केवारी ९७.४३ टक्के येते. तर उर्वरीत सात तालुक्यांमध्ये जालना ९४.६२, बदनापूर ९३.५४, अंबड ९२.१७, परतूर ९०.८०, घनसावंगी ९२.५८, मंठा ९०.७५ तर मोकरदन ९६.६० टक्के निकाल लागला आहे.