विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठांची प्रवासादरम्यान मतदान कार्ड, आधारकार्डापासून सुटका होणार असून, त्यांच्या हाती स्मार्ट कार्ड येणार आहे. विशेष म्हणजे, या स्मार्ट कार्डला रिचार्ज केले तर प्रवाशांना प्रवासा दरम्यान पैसेही बाळगण्याची गरज राहणार नाही.सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण बसद्वारे प्रवास करण्याला पसंती देतात. त्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवास करताना ज्येष्ठांना तिकिटाच्या दरात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा बसद्वारे प्रवास करण्याकडे अधिक कल असतो. राज्य परिवहन महामंडळाने ‘डिजिटलायझेशन’ स्वीकारून ‘स्मार्ट कार्ड’ ची योजना आमलात आणली आहे. स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी ज्येष्ठांना ५५ रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. आॅनलाईन नोंदणीनंतर त्यास आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे. त्यानंतर १० ते १५ दिवसात संबंधितांना ‘स्मार्ट कार्ड’ आगारातर्फे देण्यात येत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी कोठे व किती किलोमीटरचा प्रवास केला, याची माहिती एका क्लिकवर महामंडळाकडे उपलब्ध होणार आहे.यापूर्वी ज्येष्ठांसाठी अर्ध्या तिकीट दरावर ४ हजार किलोमीटर प्रवासाची मर्यादा होती. मात्र, केवळ मतदान कार्ड, आधार कार्ड पाहून प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. कोणी किती प्रवास केला, याची माहिती महामंडळाला मिळू शकत नव्हती. मात्र, आता ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्ड मशिनद्वारे स्वाईप करून प्रवास केल्यानंतर प्रवाशांच्या किलोमीटरची माहिती महामंडळाकडे संकलित होणार आहे. वर्षाच्या आत ४ हजार किलोमीटरची मर्यादा संपली तर मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकाला तिकिटाचा पूर्ण दर देऊन प्रवास करावा लागणार आहे.वर्षाला नूतनीकरण होणार१ एप्रिल ते ३१ मार्च या एक वर्षाच्या कालावधीसाठी स्मार्ट कार्डची मुदत राहणार आहे. त्यामुळे मुदत संपली की प्रत्येक वर्षी या स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करावे लागणार आहे. कार्ड हरवले किंवा खराब झाले तर शुल्क भरल्यानंतर संबंधितांना नूतन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे.बोगसगिरीला बसणार आळाबनावट कागदपत्रे दाखवून बसप्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. अनेकांवर यापूर्वी कारवाईही झाली आहे. आता स्मार्ट कार्ड योजना लागू केल्याने बसप्रवासादरम्यान होणारी बोगसगिरी आणि महामंडळाचे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे.आधारकार्ड, मतदानकार्ड चालणारस्मार्ट कार्डची आगारनिहाय नोंदणी केली जात आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट कार्ड नाही त्यांच्याकडील मतदान कार्ड, आधारकार्ड पाहून त्यांना अर्ध्या तिकिटाद्वारे प्रवास करू दिला जाणार आहे. शासनाने भविष्यात स्मार्टकार्ड सर्वांना बंधनकारक केले तर मात्र ही कागदपत्रे चालणार नाहीत.
ज्येष्ठांना मिळणार एसटीचे ‘स्मार्ट कार्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:28 AM