लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन नगर परिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीपदांची निवडणूक गुरूवारी बिनविरोध पार पडली. यात काँग्रेसला तीन, राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येकी एक - एक सभापतीपद देण्यात आले आहे.नगर परिषद कार्यालयात गुरुवारी तहसीलदार सतीश सोनी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी वंदना रमेश तळेकर, पाणीपुरवठा व जलनि:सारण सभापतीपदी उपाध्यक्ष शेख इरफानोद्दीन नजमोद्दीन सिद्दीकी, महिला व बालविकास सभापती क्रेशान अमिनाबेगम अमर, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य सभापती शेख कदीर शेख शब्बीर तर नियोजन आणि विकास समिती सभापती राहुल मंगलसिंग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मंजुषा देशमुख यांची पदसिध्द स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली.याप्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून जाफराबादचे तहसीलदार सतीश सोनी यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्षा मंजुषा राजेंद्र देशमुख, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, कार्यालयीन अधीक्षक व्ही. जी. आढे, गणेश बैरागी, समी बेग यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित समित्यांच्या सभापतींचा सत्कार करण्यात आला.आता विषय समितीची निवड जाहीर झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. ही जबाबदारी चांगल्या पध्दतीने पार पडल्यास शहराचा चेहरा-मोहरा बदलेल.
स्थायी व विषय समिती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:22 AM