नगरपालिकेच्या पथकाने यापूर्वी वेळोवेळी अतिक्रमण धारकांवर कारवाई केली आहे. मुख्य बाजारातील अतिक्रमणे हटिवली आहेत. मात्र, कारवाईच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून व्यवसाय थाटले जात आहेत. या अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद होत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रकारही वाढत आहेत. याचा त्रास पादचारी नागरिकांना होत आहे. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने सातत्याने कारवाई मोहीम राबविण्याची गरज आहे. शिवाय या व्यावसायिकांना नगरपालिकेने पर्यायी जागा देणे गरजेचे आहे.
कोरोना संसर्गाचा धोका
कोरोना रूग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, रूग्णसंख्या कायम आहे. विशेषत: आढळून येणाऱ्या रूग्णांमध्ये जालना शहरातीलच रूग्ण अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे बाजारातील गर्दीमुळे पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होताना दिसत आहे.
स्वस्त मिळते म्हणून ग्राहकांचीही गर्दी
दुकानात विकले जाणारे साहित्य आणि फुटपाथवर हातगाड्यांवर विकले जाणारे साहित्य याच्या दरात मोठी तफावत असते. त्यामुळे दुकानात मिळणारी वस्तू ही हातगाड्यावर स्वस्त मिळते म्हणून अनेक ग्राहक रस्त्याच्या कडेला थांबलेल्या हातगाड्यांवर थांबून साहित्य खरेदीसाठी गर्दी करतात.
शहरातील मुख्य मार्गासह बाजारपेठेतील रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणावर वेळोवेळी कारवाई केली जात आहे. अनेकांना नोटीसाही देण्यात आल्या आहेत. शहरातील ज्या भागात अतिक्रमणे झाली असतील तेथे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल.
-नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी