नंदा पवार यांचा सत्कार
जालना : जिल्हा कॉंग्रेस सफाई कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नंदा पवार यांची निवड झाली. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा गावडे, करण चांदोडे, श्याम मटाले, उमेश पवार, सूर्या ठाकूर, शुभम जगताप, गणेश गुटूक, उमेश साळुंकी आदी उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम
घनसावंगी : कुंभार पिंपळगाव परिसरात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी मंगळवारी साधेपणाने साजरी करण्यात आली. गावातील व फाट्यावरील विठ्ठल मंदिरात खबरदारी घेत भाविकांनी दर्शन घेतले. अभिषेक, पूजा यासह भजन, दिंडी, नगरप्रदक्षिणेसह विविध मंदिरांत भाविकांसाठी फराळाचे वाटपही करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले.
जाफराबाद येथे लसीकरण शिबिर
जालना : खासगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जाफराबाद येथील अंगणवाड्यामधील बालकांना न्यूमोनिया संरक्षण लस देण्यात आली. श्रीनय लोखंडे या बालकास लस देत मोहिमेस प्रारंभ झाला. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. सोनटक्के, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय बोर्डे, आरोग्य सेविका शेख शबाना, आरोग्य सेवक पी. ए. जेऊघाले, देशमुख, आशा स्वयंसेविका यांची उपस्थित होती.
पिंपरखेडा येथे विठ्ठलाची पूजा
घनसावंगी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या पिंपरखेडा बुद्रुक येथील विठ्ठल मंदिर परिसरात आषाढी एकादशी मंगळवारी साधेपणाने साजरी करण्यात आली. यंदा यात्रेविना सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. मंगळवारी पहाटे सरपंच सुनीता अशोक आघाव यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. यावेळी दत्तात्रय जोशी, बालासाहेब जोशी आदी हजर होते.
जि.प. शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
वालसावंगी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा अजून बंद आहे. त्यात आता विविध निधीतून शाळांना रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांअभावी शाळा परिसरात अजूनही शुकशुकाट जाणवत आहे. येथील बहिरोबानगर जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीच्या निधीतून रंगरंगोटी करण्यात आली आहे. शैक्षणिक, पर्यावरणपूरक संदेश भिंतीवर काढण्यात आले आहे.
शिंदेवडगाव येथे नेत्र तपासणी शिबिर
घनसावंगी : तालुक्यातील शिंदेवडगाव येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने मंगळवारी नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे येथील एच.व्ही. देसाई हॉस्पिटलच्या वतीने या शिबिरात २५७ जणांची तपासणी करण्यात आली. यात ४३ जणांचे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निदान झाले. यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाऱ्यासह पावसाचा उसाला फटका
मंठा : दहा ते बारा दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने उसाचे पीक आडवे झाले आहे. तर काही भागात पिकांत पाणी साचले होते. दरम्यान, तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत ५.७० मिलीमीटर तर एक जूनपासून ४४३.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात पावसाच्या हजेरीने कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूूग या पिकास जीवदान मिळाले आहे.