जालना : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला जालना सहकारी साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे कामगार व सभासदांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली. आहे.
यावेळी अरुण सराटे, लक्ष्मण घोडके, लक्ष्मण शिंदे, बन्सीधर आटोळे, मदन एखंडे यांच्यासह अनेक कामगार व सभासदांची उपस्थिती होती.
माजी खासदार कै. बाळासाहेब पवार यांनी रामनगर येथील माळरानावर जालना सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून तो यशस्वीपणे देखील चालवला होता. कै. बाळासाहेब पवार यांच्यानंतर या साखर कारखान्यामध्ये राजकारण होऊन, कर्जमुक्त झालेला साखर कारखाना कर्जबाजारी झाला. अत्यंत कमी कर्ज थकले असतानाही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हा साखर कारखाना “सरफेसी” कायदा अंतर्गत मे. तापडिया कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद यांना अल्प किमतीमध्ये विक्री केला, त्यांनी साखर कारखाना चालू केला नाही आणि २०१६ मध्ये त्यांनी हा कारखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीजला विक्री केला.
निवेदनामध्ये असेही म्हटले आहे की, रामनगर साखर कारखाना खरेदी-विक्री व्यवहारामध्ये साखर कारखाना चालू करून कामगारांचे थकीत पेमेंट अदा करण्याचे खरेदीदाराने खरेदी खतामध्ये आश्वासन दिले होते. त्याच हेतूसाठी त्यांनी साखर कारखाना खरेदी केला होता. परंतु, खरेदीदाराने अद्याप जालना सहकारी साखर कारखाना चालूही केला नाही आणि कामगारांचे थकीत पेमेंटही अदा केले नसल्याचे नमूद केले आहे.
तसेच हा साखर कारखाना बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारे साखर कामगार देशोधडीला लागले आहेत. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच अनेक कामगारांनी आर्थिक विवेचनामुळे आत्महत्या केल्याचे निवेदनात नमूद आहे.