जालना : कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या स्टील उद्योगाने गेल्या आठवडाभरात फिनिक्स भरारी घेतली आहे. मोठ्या शहरांमध्ये सुरू झालेले घरबांधणीचे प्रकल्प, तसेच शासकीय प्रोजेक्टला मिळालेली गती यामुळे स्टीलची मागणी वाढली आहे. असे असले तरी स्टील तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल अर्थात स्क्रॅपचा तुटवडा जाणवत आहे. यामुळेदेखील स्टील उद्योजकांनी दरात वाढ केल्याचे सांगण्यात आले.
जालना हे देशातील स्टीलचे उत्पादन करणारे प्रमुख केंद्र बनले आहे. त्यामुळे येथील स्टीलला मोठी मागणी असते. मध्यंतरी कोरोनामुळे हे सर्व कारखाने दोन महिने बंद होते; परंतु येथील उद्योजकांच्या चिकाटीमुळे त्यांनी हे कारखाने नव्या उमेदीने सुरू केले आहेत. त्यांच्या या धाडसामुळे हजारो लोकांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. आज जालन्यात स्टीलचे दहा मेगा प्रोजेक्ट आहेत. आणि जवळपास २१ पेक्षा अधिक रि-रालिंग मिल आहेत. यात जवळपास २५ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. आता बहुतांश स्टील उद्योजकांनी स्वत:च्या कंपनीत लिक्विड ऑक्सिजनचे प्लांट उभे केले आहेत. यामुळे स्टील कटाईला आता अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले. स्टीलचे दर वाढले असून, ४४ हजार रुपये प्रतिटनावर येऊन पोहोचले आहेत.
वीज बिलात सवलत मिळावीगेल्या काही महिन्यांत स्टील उद्योजकांनी मोठ्या हिमतीने आपले कारखाने चालविले आहेत. यासाठी ज्यावेळी मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळत नव्हते, अशाही स्थितीत हा उद्योग आर्थिक झळ सहन करून चालविला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने विशेष पॅकेज देण्यासह राज्य सरकारने वीज बिलात काही ना काही सवलत देण्याची गरज आहे. मध्यंतरी याच उद्योगाने वीज वितरण कंपनीला मोठा महसूल वीज बिलांच्या माध्यमातून दिला आहे.- योगेश मानधनी, अध्यक्ष स्टील मॅन्युफॅक्चर असोसिएशन, महाराष्ट्र.