जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णांची गंभीरता अधिक वाढविली आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णांना अतरिक्त ऑक्सिजन गरज भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन सरकारने उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा थांबविला होता. यावर आत्मनिर्भरअंतर्गत येथील पोलाद स्टीलने केवळ १८ दिवसांत स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारून त्यातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू केली.
मध्यंतरी ऑक्सिजनच्या प्लांटसाठी चाचपणी करण्यात आली. पोलादच्या संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय झाला. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील पाच तज्ज्ञ अभियंत्यांना पोलादमध्ये पाचारण करून सर्व संचालक मंडळ तसेच कंपनीतील अधिकारी, कर्मचारी यासाठी अहोरात्र जागून हा हवेतून ऑक्सिजनचे शोषण करून प्लांट सुरू केला. त्यातून दररोज साधारपणे ३०० पेक्षा अधिक सिलिंडरची निर्मिती होऊ शकते. दरम्यान, या प्लांटची पाहणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नुकतीच केली.
दरम्यान, कंपनीला आवशक्यक तेवढा ऑक्सिजन घेवून उर्वरित ऑक्सिजन हा कोरोना रुग्णांसाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी केवळ रिकामे सिलिंडर आणून ते त्यांनी घेऊन जायचे आहे.
एवढ्या कमी काळात हवेतून ऑक्सिजन प्लांटची उभारणी केल्याबद्दल केंद्रेकर तसेच रवींद्र बिनवडे यांनीदेखील कंपनी व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.