जालना : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधींसह गुंगी आणणाऱ्या औषधींचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न-औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अंबड तालुक्यातील पारनेर फाटा येथे सापळा लावला. त्याचवेळी एका दुचाकीवरून माहिती मिळाल्याप्रमाणे दोन युवक आढळून आले. त्यांना पोलिसांनी अडविले असता, त्यातील एक जण पळून गेला, तर ज्याच्याकडे काळ्या रंगाची बॅग होती त्या युवकाच्या बॅगची झडती घेतली असता, त्यात गर्भपातासाठी उपयोगात येणाऱ्या एक हजार २०० टॅबलेट्स आढळून आल्या. ज्याची किंमत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
या प्रतिबंधक औषधींप्रमाणेच गुंगी आणणारी औषधी अर्थात टॅबलेट्स आणि पुरुषांची उत्तेजना वाढविण्यासाठीच्या गोळ्याही जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा औषधींचा साठा त्यांनी कुठून आणला होता आणि तो जालन्यासह अन्य कुठल्या शहरांमध्ये वितरित करणार होते, त्याचा तपशील गोळा केला जात असल्याची माहिती जालन्यातील अन्न व औषधी विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिली. याबाबत अंबड पोलिसांनीदेखील त्यांचा स्वतंत्र तपास सुरू केल्याचे सांगण्यात आले. जालन्यात आधीदेखील याच महिन्याच्या प्रारंभी जुना जालना भागातील एका मेडिकलवरून गर्भपातासाठीच्या गोळ्यांचा साठा जप्त केला गेला होता आणि आता पुन्हा हा साठा पकडल्याने हे मोठे रॅकेट असल्याचे दिसून येत आहे.
एकास अटक, दुसरा फरारअटक केलेल्या आरोपीचे नाव मोहंमद शोएब मोहंमद असिफ (रा. रोडा, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे असून, त्याचा दुसरा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस त्याचा शोध घेत असून, त्याला लवकरच अटक केली जाईल, असे अंबड पोलिसांनी सांगितले. या कारवाईत अन्न औषध विभागाचे सहआयुक्त संजय काळे, अंजली मिटकर, वर्षा महाजन, पोलीस कर्मचारी नागवे, दराडे साळवे यांचा समावेश आहे.