लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शवविच्छेदन अहवालासाठी टेंभुर्णी ग्रामीण रूग्णालयात गोंधळ घालत दगडफेक केल्याप्रकरणी एकाविरूध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास टेंभुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात घडली.टेंभुर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी अमोल पुंजाराम वाघ व त्यांचे सहकारी बुधवारी पहाटेच्या सुमारास काम करीत होते. त्यावेळी तेथे आलेल्या आत्माराम भावसिंग तायडे (रा. खानापूर ता. जाफराबाद) याने ‘भावाच्या खुनामध्ये तू मिळालेला आहे. त्याचा भाऊ दादाराव याचा पोस्टमार्टेम रिपोर्ट दे’ असे म्हणत गोंधळ घालत वॉर्डामधील खुर्च्या फेकून दिल्या.तसेच वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांना ढकलाढकली करीत त्यांच्या दिशेने बेदरकारपणे दगडफेक केली. या प्रकारामुळे टेंभुर्णी येथील रूग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात अमोल वाघ यांनी दिलेल्या तक्रारीवरून आत्माराम तायडे विरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोउपनि साखळे हे करीत आहेत.
रुग्णालयात दगडफेक; एकाविरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:09 AM