जालना : अंतरवाली सराटी येथील घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशीही जालना शहरात उमटले आहेत. शहरातील अंबड चौफुली परिसरात शनिवारी सकाळी हजारोंचा जमाव जमा झाला होता. यावेळी तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. शिवाय पाेलिसांच्या वाहनावरही दगडफेक करून एक ट्रक पेटविण्यात आला. सूचना करूनही संतप्त जमाव ऐकत नसल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत रबर बुलेट फायर करीत आश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील लाठीचार्जच्या घटनेनंतर जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात अंतरवाली सराटी घटनेचे पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी रास्तारोको करून आंदोलन करण्यात आले. व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदविला. जालना शहरातील अंबड चौफुलीवर सकाळी १० वाजल्यापासून हजारोंचा जमाव जमा झाला होता. या ठिकाणी तहसीलदार छाया पवार या वाहनातून आल्या होत्या.
जमावाने तहसीलदारांच्या वाहनावर अचानक दगडफेक करीत ते वाहन फोडून टाकले. उपस्थित काहींनी तहसीलदार छाया पवार यांना जमावातून बाहेर काढत खासगी वाहनातून कार्यालयाकडे रवाना केले. त्याचवेळी पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक करण्यात आली आणि एका ट्रकलाही आग लावण्यात आली. जमाव संतप्त होवून दगडफेक करीत असल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करीत आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परंतु, जमाव तरीही अटोक्यात येत नसल्याने पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती.