भोकरदन : तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विशेष करून नवे भोकरदन शहरात तर अक्षरश: यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी काही उमेदवारांनी तर अर्ज दाखल करण्यापूर्वी कागदपत्रे तपासून घेण्यासाठी चक्क तहसीलदारांच्या निवासस्थानासमोर ठाण मांडले होते.
तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडणार आहेत. यापूर्वी ऑनलाइन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी (३० डिसेंबर) उमेदवारांचे ऑफलाइन अर्ज घेण्यासाठी अनुमती दिली होती. या दिवसासह अगोदरच्या दिवशी भोकरदन शहर व नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता, तर ठिगळखेड येथील ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी तहसीलदार संतोष गोरड यांच्या निवासस्थानासमोर ठाण मांडून उमेदवारांची अर्ज तपासणी केली होती.