लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकमतमध्ये प्रकाशित होत असलेल्या ‘पंचनामा पालिका भूखंडाचा’ या वृत्तमालिकेचे शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत तीव्र पडसाद उमटले. काही सदस्यांनी सभागृहात लोकमतचा अंक हातात घेऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तर वृत्तमालिकेत प्रकाशित झालेल्या बीओटी तत्त्वावरील बांधकामे, पालिकेचे भूखंड, तसेच सर्व्हे क्रमांक ४४६/२ एक व्यक्तीने मिळविलेल्या ताब्याचे सभागृहात तीव्र पडसाद उमटले.शहरातील अनेक मोक्याच्या ठिकाणचे भूखंड काहींनी बळकावले आहेत. ही बाब सर्वश्रुत असतानाही आपापसातील तडजोडीमुळे राजकीय पदाधिकारी याबाबत ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असतात. मात्र लोकमतने ‘पंचनामा पालिका भूखंडाचा’ ही वृत्तमालिका सुरू केल्यामुळे अनेक बाबी समोर येत आहेत. सर्वसाधारण सभेत सदस्य शहा आलम खान यांनी लोकमतचे तीन दिवसांचे हॅलो जालनाचे अंक दाखवून सर्वे क्रमांक ४४६/२ या पालिकेच्या मालकीच्या, मात्र सध्या एका खाजगी व्यक्तीच्या ताब्यात असलेल्या जागेचा मुद्दा उपस्थित केला. तर सदस्य विजय चौधरी यांनी याच मुद्यावर मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना धारेवर धरले.बीओटीवर बांधलेल्या शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल (टाऊन हॉल) येथील ५२ गाळे बारा वर्षांपासून इतरांच्या ताब्यात आहेत. यातून पालिकेला काहीच उत्पन्न मिळत नाही.जबाबदार अधिकारी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगतात. पालिकेचे असे कोणते वकील आहेत, जे आठ वर्षांपासून हे प्रकरण लढवत आहेत, याची माहिती मुख्याधिका-यांनी सभागृहाला द्यावी. प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर या दुकानांना टाळे लावावे, असे उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी सभागृहात सांगितले. यावर मुख्याधिकारी खांडेकर निरुत्तर झाले.
‘लोकमत’च्या वृत्तमालिकेवर घमासान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:18 AM