जालना : शहराचा पाणी पुरवठा वीस दिवसापासून विस्कळीत झाला आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय सुरु आहे. पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली. यावेळी परिसरात वाहनांच्या रांगाच - रांगा लागल्या होत्या.वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक वैतागले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे असते. असे असतांना पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही यावेळी संतप्त नागरिकांनी केला. शहरात येणाऱ्या पाण्याची चोरी होत असल्याने शहरात वीस दिवसापासून पाणी येत नसल्याचे सांगितल्या जाते. मात्र, कन्हैयानगर येथे गेल्या दोन महिन्यापासून नागरिक पाण्याविना हैराण आहे.शहराच्या पाणी वाटपावरुन राजकारण करण्यात येत आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून जात असल्याचा आरोप येथील नगरसेवक राहुल इंगोले यांनी केला.झोपडपट्टी परिसर असल्याने विकतचे पाणी घेण्याची परिस्थिती येथील नागरिकांची नाही. सर्वजण मोल- मजूरी करुन पोटभरणारे आहेत. निवडणुकीच्या वेळी मत मागायला येणारे कोठे लपून बसले असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी केला. वाहनांची वर्दळ असलेल्या कैन्हैयानगर येथील चौफुलीवर तासभर आंदोलन करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.आश्वासनानंतर आंदोलन मागेनगरपालिकाचे पाणी पुरवठा सभापती रमेश गोरंक्षक, आणि पाणी पुरवठा विभागाचे अभियंता घुगे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. शनिवारी संध्याकाळपर्यत कन्हैयानगर परिसरात पाणी सोडण्याचे आश्वासन सभापती, अभियंत्याने दिल्याने तासाभºयानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी चंदनझिरा पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
जालन्यात संतप्त नागरिकांचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:05 AM
पैसे मोजूनही पाणी मिळत नसल्याने शहरातील कन्हैयानगर परिसरातील नागरिकांनी दुपारी चार वाजता कन्हैयानगर चौफुली येथे तासभर रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.
ठळक मुद्देआंदोलक आक्रमक : टँकरने पाणीपुरवठा करावा, काहीकाळ वाहतूक ठप्प