जालना : मागील काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ए. यू. स्मॉल फायनान्स बॅंकेकडून गणेश चौधरी यांना युथ आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अमजत पठाण व दिनेश वरखड यांच्याहस्ते हा पुरस्कार चौधरी यांना देण्यात आला.
निधी संकलनासाठी शोभायात्रा
मंठा : प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमी मंदिर बांधकामासाठी तालुक्यासह परिसरातील काही गावांमध्ये प्रत्येक कुटुंबांकडून निधी संकलन करण्यात येणार आहे. यासाठी रविवारी निधी संकलन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय मंठा शहरात रविवारी धार्मिक व
सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
बेकायदेशीर रस्ता खोदल्याची तक्रार
परतूर : शहरातील हिरालाल नगरमधील सर्विस रोड दिंडी मार्गाचे संबंधित कंत्राटदारांनी विना परवानगी व बेकायदेशीर नगरपरिषदेच्या मालकीचा शंभर ते दीडशे फुटापेक्षा जास्त रोड खोदला आहे. यात पालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन उपनगराध्यक्ष खतीब सादेकोद्दीन रियाजोद्दीन यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन
जालना : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय निवारा परिषदेच्या वतीने सोमवारी मुंबई येथील आझाद मैदान येथे सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन असणार असून, यात अनेकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटना प्रमुख डी. डी. गायकवाड यांनी केले आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिले आहे.
जालन्यात निधी संकलन यात्रा उत्साहात
जालना : अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिर निधी संकलनासाठी जालन्यातील भाग्यनगर येथे शुक्रवारी रथयात्रा काढण्यात आली. गणपती मंदिराजवळ रामदास महाराज यांच्या हस्ते या रथयात्रेचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ही रथयात्रा वृंदावन नर्सरी, गोकूळ नगरी, राणा नगर, इंदिरा नगर, वृंदावन कॉलनी, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, आनंदी स्वामी आदी परिसरातून काढण्यात आली.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा खुरपणीला वेग
रोषणगाव : बदनापूर तालुक्यातील रोषणगाव परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा खुरपणीला सध्या वेग आलेला आहे. मागणीच्या तुलनेत मजुरांची कमतरता पडत आहे. त्यामुळे अनेक कुटुंब प्रमुख घरीच खुरपणीची कामे करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचा पेरा रोषणगाव परिसरात वाढला आहे. शिवाय सध्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतीची कामे सुरू आहेत.
अमोल दाहिजे यांचा गौरव
भोकरदन : शहरातील न्यू हायस्कूलचा माजी विद्यार्थी अमोल दाहिजे याची एम.डी. या शिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (उस्मानाबाद) येथे निवड झाली आहे. याबद्दल न्यू हायस्कूलच्या वतीने त्याचा मुख्याध्यापक व्ही.डी. सुसर यांनी सत्कार केला. या वेळी व्ही. एम. माळी, डी.पी. चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.