जालना : जुना जालन्यातील रेल्वे उड्डाणपूल ते अंबड चौफुली या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. वेळीच रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
रस्ता दुभाजकांमध्ये होणार वृक्षलागवड
जालना : शहरातील सर्वच चौफुल्यांना जोडल्या जाणाऱ्या रिंगरोडच्या सिमेंटिकरणाचे काम सुरू आहे. अंबड ते औरंगाबाद चौफुली, नवीन मोंढा रस्ता या परिसरातील काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यांच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये माती टाकून झाडे लावण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने सध्या काम सुरू आहे.
मठ पिंपळगाव येथे मार्गदर्शन कार्यक्रम
अंबड : तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील मत्स्योदरी महाविद्यालयात मकरसंक्रात व विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा.दिगांबर दाते यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक राहुल भालेकर, डॉ.सुहास सदाव्रते, सुनील पवार आदींची उपस्थिती होती.
तलावाचे सुशोभीकरण
जालना : जुना जालना शहराच्या रेल्वे पटरी लगत असलेल्या मुक्तेश्वर तलावाचे सुशोभीकरण केले जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्दगर्शनाखाली नगरसेवक लक्ष्मीकांत पांगारकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. सध्या येथे पादचारी रस्ताही करण्यात आला.
राज्याभिषेक सोहळा
परतूर : तालुक्यातील आसनगाव येथे छत्रपती राजे संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन संभाजी मित्रमंडळाच्या वतीने नुकताच साजरा करण्यात आला. या प्रसंगी मित्रमंडळाचे अध्यक्ष रामेश्वर खरात, मच्छिंद्र खरात, भागवत खरात आदींची उपस्थिती होती.
अतुल लढ्ढा यांचा औरंगाबादेत सन्मान
जालना : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ची कॅबिनेट बैठक नुकतीच औरंगाबादेत झाली. यावेळी लॉ.अतुल लढ्ढा यांना लॉ.डॉ. नवल मालू यांनी इंटरनॅशनल पिन देऊन गौरव केला. लायन्स इंटरनॅशनल क्लब ही १०४ वर्षांपासून जुनी सेवाभावी संस्था आहे. २१० देशांमध्ये कार्यरत असल्याचे माहिती देण्यात आली.
दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप
अंकुशनगर (महाकाळा) : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना व साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप करण्यात आले. यात हात, कुबडी, काठी, हात व पायांच्या पंज्याचा समावेश आहे.
पाथरवाला बुद्रुक, कुरण गावात जल्लोष
अंबड : तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक व कुरण या ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मयोगी अंकुशराव टोपे पॅनलचा विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. टोपे ग्रामविकास पॅनलचे सहा उमेदवार बिनविरोध तर सात उमेदवार विजयी झाले आहेत.
दहा जागांवर विजय
जाफराबाद : तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पॅनलने दहा जागांवर विजय मिळविला आहे, तर शिवसेनेच्या पॅनलला तीन जागा खेचून आणण्यात यश मिळाले आहे. गावात १३ जागांसाठी ३० उमेदवारांनी नामनिर्देश पत्र भरले होते. विशेष म्हणजे यातील सर्वांनीच निवडणूक लढविली होती.
तहसील परिसरात गर्दी
अंबड : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. मतमोजणीदरम्यान हजारो नागरिकांनी शहरातील तहसील परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी १४ टेबलवर मतमोजणी झाली. या प्रसंगी नायब तहसीलदार बाबुराव चंडोल, डी. एन. पोटे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, अंजली कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
पशुवैद्यकीय विभागाला रिक्तपदांचे ग्रहण कायम
पारध : पशुसंवर्धनाची काळजी घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषद व राज्य शासन यांची आहे. असे असताना भोकरदन तालुक्यात वैद्यकीय विभागाला रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे जवळपास तालुक्यातील ६२ हजार १५० जनावरांच्या आरोग्यसेवेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, पशुपालक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
जालना : राज्यातील मातंग समाजात लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीतून वेगळे आरक्षण देण्यासाठी बिंदुसरा धरणात जलसमाधी घेणारे स्व. संजय ताकतोडे यांना जाहीर केलेली मदत तत्काळ देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.