- विकास व्होरकटे
जालना : क्षयरोग झालेल्या रूग्णांना सकस आहार मिळावा, यासाठी केंद्र शासनाने निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. यात १ जानेवारी ते ३ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधित मराठवाड्यात सर्वाधिक लाभ जालन्यातील १ हजार १३६ क्षयरोग ग्रस्तांना मिळाला आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने आॅक्टोबर २०१७ पासून क्षयरोगावरील औषध उपचार घेणाऱ्या रूग्णांकरिता निक्षय पोषण योजना सुरू केली आहे. रूग्णांना सकस आहार मिळावा, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेंतर्गत शासकीय किंवा खाजगी रूग्णालयांमध्ये क्षयरोगावर औषधोपचार घेणाऱ्या रूग्णास प्रति महिना ५०० रूपये पोषण आहार भत्ता दिला जातो. याची रक्कम सदरील रूग्णाच्या बँक खात्यावर जमा केली जाते.
१ जानेवारी ते ३ सप्टेंबर या आठ महिने तीन दिवसांच्या कालावधीदरम्यान परभणी जिल्ह्यात १ हजार ३७८ क्षय रोगग्रस्त उपचार घेणारे आढळून आले आहेत. यातील ५६१ (५७ टक्के) जणांना निक्षय पोषण योजनेचा लाभ मिळाला आहे. औरंगाबादेत ९२५ रूणांपैकी ३७८ (४८ टक्के), बीड १ हजार रूग्णांपैकी ७५७ (६२ टक्के), उस्मानाबाद ८११ पैकी ६८८ (७२ टक्के), नांदेड १ हजार ३०० जणांपैकी १०५९ (७३ टक्के), हिंगोली ५६४ पैकी ४२४ (६८ टक्के), लातूर १२७० पैकी ९६८ (६४ टक्के) तर जालना जिल्ह्यात १२०२ पैकी १ हजार १३६ लाभार्थ्यांना (८३ टक्के) निक्षय पोषण योजनेचा लाभ मिळाला आहे. यात २१ लाख ४९ हजार रूपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.
असा होतो उपचार क्षयरोग ग्रस्त रूग्णावर दोन टप्प्यात औषधोपचार केले जातात. पहिल्या टप्प्यातील सहा महिन्यादरम्यानच्या कालावधित रूग्णाला औषध उपचार करूनही फरक न पडल्यास त्याला एमडीआरटीबी म्हणून घोषित केले जाते. यात १२ ते २४ महिन्याच्या कालावधीत उपचार केले जातात. यात लाभार्थ्याला प्रति महिना ५०० रूपये दिले जातात.
... तर यांना बक्षिस जिल्ह्यातील क्षयरोग रूग्णांची माहिती तातडीने जिल्हा प्रशासनाला मिळावी, जेणेकरून रूग्णांवर उपचार करणे सुलभ होईल, यासाठी शासनाच्या वतीने बक्षिस स्वरूपात एक योजना राबविली जाते. यात आशा, स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या व सामाजिक कार्यकर्ता यांनी क्षयरोग ग्रस्त रूग्णाची जिल्हा कार्यालयास माहिती दिल्यास त्यांना प्रति रूग्ण ५०० रूपयांचे बक्षिस दिले जाते.
क्षयरोगाचा आलेख वाढताच जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांचा क्षयरोग ग्रस्तांचा आढाव घेतल्यास यात दरवर्षी रूग्णांची वाढ झालेली दिसून येत आहे. २०१७ मध्ये जिल्ह्यात ३२३ क्षयरोगाचे रूग्ण उपचार घेणारे आढळून आले होते. २०१८ मध्ये २०७३ तर २०१९ मध्ये तब्बल २७१८ क्षयरोगाचे रूग्ण आढळून आले आहेत.
रुग्णांनी बँक खात्याची माहिती द्यावी खाजगी किंवा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या क्षयरूग्णांनी तातडीने त्यांचा बँक खात्यांची माहिती आयएफएससी कोडसह जमा करावी. जेणेकरून रूग्णांना निक्षय पोषण योजनेचा वेळेवर लाभ मिळेल.- डॉ. ए. बी. जगताप, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जालना