लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या अनेक वर्षापासून जालना येथील नागेवाडीस्थित शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पाणी समस्या कायम आहे. स्वतंत्र पाईपलाइन मिळाली नसल्याने ही अडचण असल्याचे दिसून आले. दरम्यान बुधवारी येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाणी नसल्याच्या कारणावरून रोष व्यक्त करून ठिय्या आंदोलन केले. तसेच प्राचार्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.येथील शासकीय तंत्र निकेतमध्ये दोन वसतिगृहे आहेत. त्यात जवळपास १८० मुले आणि जवळपास ९६ विद्यार्थिनी राहतात. गेल्या काही वर्षापासून येथील पाणी समस्या कायम आहे. मध्यंतरी विद्यार्थ्यांनी श्रमदानातून पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, ती कोलमडली आहे. जालना नगर पालिकेकडे या महाविद्यालयाने स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची मागणी केली होती. परंतु ती अद्यापर्यंत पूर्ण झाली नाही. जी जलवाहिनी आहे, त्यातून पाणीपुरवठा होत नाही.त्यामुळे येथील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणीटंचाईला नेहमीच सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना पाणी समस्या जाणवू नये म्हणून महाविद्यालयाकडून दररोज तीन टँकरने पाणीपुरवठा केला जातो. बुधवारी ज्या विहिरीतून टँकर भरले जातात, तेथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे टँकर येण्यास उशीर झाल्याची माहिती प्राचार्य एस.आर.नवले यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या रोषानंतर प्राचार्यांनी तातडीने लक्ष घालून टँकरची व्यवस्था केली.संतप्त विद्यार्थ्यांनी सकाळी साडेदहा वाजता हे ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली. यापूर्वीही या महाविद्यालयातील समस्या सोडवण्यासाठी विविध पातळीवरून प्रयत्न केले गेल्याचे सांगण्यात आले.
तंत्रनिकेतनमध्ये पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:41 AM