लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील सावंगी येथील जिल्हा परिषद शाळेची मुले शनिवारी निसर्गाच्या सान्निध्यात रमली. निमित्त होते ‘एक शनिवार- बिनदप्तराचा’ या उपक्रमाचे. सध्या टेंभुर्णी केंद्रातील प्रत्येक शाळेत हा उपक्रम राबविला जात आहे.बिनभिंतीची उघडी शाळा... लाखो इथले गुरू... झाडे.. वेली.. पशु.. पक्षी.. त्यांशी मैत्री करू.. असे म्हणत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त जीवरेखा नदीच्या काठावर निसर्ग शाळेचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी पाने, फुले, पक्षी यांचे जवळून निरीक्षण केले. काही विद्यार्थ्यांनी नदीच्या वाळूत शंख, शिंपले, दगडगोटे जमा केले. यावेळी विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या शैक्षणिक व मैदानी खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. विशेष म्हणजे या दिवशी खिचडीही रानातच शिजली. नंतर विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून वन- भोजनाचाही आनंद घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रमेश साळवे, शिक्षक अनिल वाघ, शिक्षिका लता सपकाळ, ज्योती धनवई आदींची उपस्थिती होती.शाळेच्या चार भिंतीच्या बाहेरच्या जगाचे विद्यार्थ्यांना नेहमीच कुतुहल असते. शाळेची घंटा, परिपाठ, गृहपाठ, अभ्यास, शिस्त इ. दररोजच्या गोष्टींंना विद्यार्थी कंटाळलेले असतात.
विद्यार्थी रमले निसर्गशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:35 AM