लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून मानव मिशन अंतर्गत आठवीच्या विद्यार्थिंनींना सायकल वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हाभरात आतापर्यंत ३ हजार ७०४ मुलींना सायकल वाटप करण्याचे काम सुरू आहे. यासाठी १ कोटी २९ लाख रूपयांचा निधी मिळाला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींना एका गावातून दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी पायपीट करत जावे लागत होते. शाळेच्या वेळेत वाहनांची सोय नसलेल्या मुलींना पायपीट करावी लागत होती. यासाठी शासनाने २०१३-१४ पासून मानव विकास मिशनअंतर्गत आठवीच्या मुलींना सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला निधी देण्यात येतो. जालना जि.प.च्या शिक्षण विभागाला यावर्षी १ कोटी २९ लाख ६४ हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला असून, यातून ३ हजार ७०४ विद्यार्थिंनींना सायकल वाटप करण्याचे काम सुरू आहे.प्रत्येक मुलीला सायकल खरेदी करण्यासाठी त्यांच्या खात्यात ३५०० रूपये जमा केलेले जातात. यातील काही मुलींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.उर्वरित रक्कम मुलींच्या खात्यात जमा करण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.शासन २०१३ व २०१४ पासून मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थिंनींना सायकल वाटप करते. त्यानुसार मागील सहा वर्षांपासून शासनातर्फे २१ हजार ६०० विद्यार्थिंनींना सायकलचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलींची पायपीट थांबली आहे.दरवर्षी शासन आठवीच्या विद्यार्थिंनींना सायकल वाटपासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. यामुळे वाहतुकीच्या साधनांअभावी शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थिनींची होणारी पायपीट आता दूर होत आहे.
विद्यार्थिनींची थांबणार पायपीट; १ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:29 AM