लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : येथील पूर्णा नदीपात्रातून दिवसरात्र बेसुमार अवैध वाळूचा उपसा करण्यात येत आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडल्याने पात्राचे नुकसान होत आहे. चोरट्या वाळू वाहतुकीकडे महसूल, पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.परिसराची लाईफलाईन म्हणून पुर्णानदीची ओळख आहे. नदीत पाणी साचले तर परिसरातील पिण्याचा आणि सिंचनाचा पाण्याचा उपयोग होतो. मात्र नदीपात्रातील वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने पडलेले पावसाचे पाणी सुध्दा नदीपात्रात साचले नाही. असे असतांना सुध्दा नदीतून जेसीबीच्या सहायाने खड्डे करुन वाळूची चोरी करण्यात येत आहे. दररोज हजारो ब्रास वाळुचा अवैध उपसा केल्या जात असल्याने पात्राची चाळणी झाली आहे. वाळुचा उपसा करुन बिनधास्त वाहतूक सुरु आहे. असे असतांना महसूल आणि पोलिसांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांत संताप आहे. विशेष म्हणजे पुर्णा नदीत होणारा अवैध वाळू उपसा जालना- भोकरदन मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. आणी याच रस्त्यावरून स्पष्ट दिसणारा आहे. असे असतांना दोन्ही विभागाचे अधिकारी कर्मचार याकडे कानाडोळा करीत आहेत. वाळू उपशामुळे येथील कोल्हापुरी बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. महसूल विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
बेसुमार वाळू उपशामुळे पूर्णा नदीपात्राची चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:24 AM