शनिवारी राज्यमंत्री सत्तार हे जालना दौऱ्यावर आले होते.
यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव, खोतकर, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, माजी आ. संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. पाटील बोराडे, बदनापूर पंचायत समिती सभापती बी. टी. शिंदे, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, पंडित भुतेकर, भगवान कदम, भानुदास घुगे, बाळाभाऊ वाघ यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, तहसीलदार छाया पवार, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, गटविकास अधिकारी विठ्ठल हरकर, तालुका कृषी अधिकारी व्यंकटेश ठेके, आदींची उपस्थिती होती.
महसूल राज्यमंत्री सत्तार म्हणाले, बदनापूर व जालना तालुक्यांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साचले असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून, फळपीकही उद्ध्वस्त झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतपीक व फळपिकांसह जनावरे, रस्ते, पूल तसेच घरांचीही पडझड झाली असून, झालेल्या या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणांनी तातडीने करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्तांना शासनामार्फत मदत केली जाणार असल्याचेही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर, अंबडगाव, नानेगाव तसेच जालना तालुक्यातील गोलापांगरी, बठाण, रेवगाव, साळेगाव घारे या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.